Satara: चूक मुलाची; बेतली आई-वडिलांच्या जीवावर; सख्ख्या चुलत भावानेच भाऊ, भावजईचा केला निर्घृण खून
By दत्ता यादव | Published: October 9, 2023 01:54 PM2023-10-09T13:54:41+5:302023-10-09T13:58:55+5:30
डोक्यात कुऱ्हाडीने केले वार
सातारा : मुलाने केलेल्या अत्याचाराची घृणास्पद चूक आई-वडिलांच्या जीवावर बेतली. सख्ख्या चुलत भावानेच अत्याचाराचा बदला म्हणून भाऊ आणि भावजईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना माण तालुक्यातील आंधळी या गावात घडली.
आंधळी, ता. माण येथील संजय रामचंद्र पवार (वय ४९) व मनीषा संजय पवार (वय ४५) या दाम्पत्याचा शनिवार, दि. ७ रोजी रात्री दहा वाजता निर्घृण खून करण्यात आला. हा खून सख्ख्या चुलत भावानेच केल्याचे तपासात उघड झाले असून, या घटनेनंतर आरोपीला दहिवडी पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली. दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार (वय ३५, रा. आंधळी, ता. माण) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत दहिवडी पोलिस ठाण्यातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संजय पवार व मनीषा पवार हे दोघे शनिवारी रात्री दहा वाजता पवारदरा शिवारात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. संजय पवार हे चेंबर खोलून मोटार सुरू करत होते तर त्यांची पत्नी मनीषा या पिकाला खत टाकत होत्या. एवढ्यात मागून येऊन संजय यांचा सख्खा चुलत भाऊ दादासो पवार याने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नी मनीषा मदतीसाठी धावून आल्या. तेव्हा त्यांच्यावरही दादासो पवारने कुऱ्हाडीने घाव घातला. यात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर दादासो पवार तेथून पसार झाला.
सकाळी पवार दाम्पत्य घरी का आले नाही म्हणून शिवारात जाऊन काही लोकांनी पाहिले असता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. पोलिस पाटील यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी आश्विनी शेडगे, सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केल्यानंतर हा खून दादासो पवार याने केल्याचे पोलिसांना समजले.
तो खून केल्यानंतर कारने पुण्याला गेला. तेथून पुन्हा फलटणमार्गे घरी येत असताना पोलिसांनी त्याला वाटेतच पकडले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने कसलेही आडेवेडे न घेता खुनाची कबुलीही दिली. मृत संजय पवार यांच्या पश्चात आई, एक विवाहित व एक अविवाहित मुलगी तसेच एक मुलगा आणि भाऊ आहे. दहिवडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
खुनाचे हे कारण...
मृत पवार दाम्पत्य आणि चुलत भाऊ दादासो पवार यांचे अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. मृत संजय पवार यांच्या मुलाने एका तरुणीवर अत्याचार केला होता. या प्रकरणाचा राग अनेक दिवस दादासो पवारच्या डोक्यात होता. तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी वारंवार तो धमकी देत होता. रात्री दोघे शेतात गेल्याची संधी साधून चुलत भाऊ आणि वहिनीचा त्याने खून केला, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.