रस्त्यावर कुडकुडणाऱ्यांना मिळालं मायेचं पांघरूण
By admin | Published: December 9, 2015 11:48 PM2015-12-09T23:48:15+5:302015-12-10T01:01:44+5:30
‘लोकमत’चा पुढाकार : दिलदार सातारकरांनी दिला मदतीचा हात
सातारा : ऐन कडाक्याच्या थंडीत अपुऱ्या कपड्यात कुडकुडत रात्रभर रस्त्याकडेला झोपणाऱ्या निराधारांना ऊबदार पांघरूण मिळावे, यासाठी ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारकरांनी शाल, चादर, ब्लँकेट अशा वस्तू देऊ केल्या. बुधवारी या वस्तूंचे वाटप केले अन् रस्त्यावर कुडकुडणाऱ्यांना मायेचं पांखरूण मिळालं.निसर्गाच्या लेखी सर्वांना समान न्याय असतो. तो श्रीमंत-गरीब असा भेद करत नाही. खात्यापित्या लोकांच्या डोक्यावर सुरक्षिततेसाठी हक्काचं छत असतं. मुबलक अंथरूण, पांघरूण असतं पण निराधार लोकांचं काय? उघड्यावर राहताना त्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी कोणतीच साधने नसतात. अशा लोकांना सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हात देणे गरजेचे असते. ‘लोकमत’ने ‘इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून सातारा शहरातील विविध भागांमध्ये रस्त्याकडेला कुडकुडत बसणाऱ्या निराधारांना मायेचं पांघरूण मिळावं यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्याला सातारकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
बुधवारी सायंकाळी बसस्थानक परिसरातील अशा निराधारांना ऊबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. येथील रोहन घोरपडे, जितेंद्र कदम, नीलेश धनवडे, रवी पवार, आनंद पंचपोर, युवराज शिंदे, मनोज खडतरे, समीर निकम व धैर्यशील टोणपे या तरुणांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून चादर, ब्लँकेट, शाल नवीन खरेदी करून त्याचे वाटप निराधारांना केले. (प्रतिनिधी)
दुपारी कडकडीत ऊन, रात्री कडक थंडी!
सातारा : वातावरणातील बदलामुळे ऋतू कधी कूस बदलतो, हेही लक्षात येत नाही. हिवाळा सुरू होऊन दोन महिने झाले पण असह्य उकाड्यामुळे घरात रात्री पंखा सुरू ठेवल्याशिवाय झोप लागणे मुश्किल होते.
आता दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे खरी; पण दिवसभर कडकडीत उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. बुधवारी शहरात कमाल ३१.४ तर किमान १२.८ अंश
सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
जिल्हाभर थंडीची लाट निर्माण झाल्यामुळे ऊबदार कपडे परिधान करूनच बाहेर पडावे लागत आहे. दुचाकीचालक युवक तोंडाला मास्क बांधून तर युवती स्टोलचा वापर करताना दिसत आहेत. बोचऱ्या थंडीमुळे शरीरावर परिणाम होत असल्यामुळे नागरिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध प्रसाधनांचा वापरही करत आहेत.