विहिरीत पडलेल्या गव्याची आठ तासांनंतर सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:42 AM2021-01-13T05:42:20+5:302021-01-13T05:42:20+5:30
महाबळेश्वर : येथील ग्रीनवूड सोसायटीतील विहिरीत पडलेल्या रानगव्यास तब्बल आठ तासांच्या प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढण्यात वन्यजीव संक्रमण व उपचार ...
महाबळेश्वर : येथील ग्रीनवूड सोसायटीतील विहिरीत पडलेल्या रानगव्यास तब्बल आठ तासांच्या प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढण्यात वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्र कोल्हापूर, टीम महाबळेश्वर ट्रेकर्स, वनविभाग व सह्याद्री प्रोटेक्टर्सच्या प्राणीमित्रांना यश आले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्राणिमित्रांच्या या कामगिरीचे कौतुक केले.
लिंगमळा परिसरात ग्रीनवूड सोसायटी असून, सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास वेण्णा नदीपात्रात एक रानगवा पाणी पिण्यासाठी आला होता. मुख्य रस्ता ओलांडून तो पुन्हा जंगलात जात असताना ग्रीनवूड सोसायटीसमोर एका अज्ञात वाहनाची त्याला जबर धडक बसली. या धडकेमुळे बिथरलेला रानगवा विहिरीत पडला. वनविभागाने याबाबतची माहिती महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना दिली. ट्रेकर्स टीम दाखल होत दुपारी चारच्या सुमारास बचाव कार्यास सुरुवात झाली होती. विहिरीवर लोखंडी जाळी असल्याने त्याला विहिरीबाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. गवा विहिरीत बुडून मृत होण्याची शक्यता ओळखून महाबळेश्वर ट्रेकर्स जवानांनी दोरखंडाच्या साह्याने गव्याच्या शिंगांना बांधून तो पाण्यावर तरंगेल अशी व्यवस्था केली होती. कोल्हापूर येथील टीमला येण्यासाठी वेळ लागणार असल्याने ट्रेकर्स टीमकडून एका बाजूची विहिरीवरील लोखंडी जाळी कापली व विहिरीवरील भाग मोकळा केला. त्यानंतरही अंधारात महाबळेश्वर पालिकेकडून बचावकार्य सुरूच राहिले.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयसिंग सिसोदिया, डॉ. संदीप आरडे, डॉ. विकास महाजन हेदेखील घटनास्थळी पोहोचले. कोल्हापूर येथील वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्र टीम, वनवृत्त विभाग व स्वयंसेवक, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी इंडिया, वन्यप्राणी संवर्धन आणि संशोधन फाउंडेशन, इचलकरंजी सह्याद्री प्रोटेक्टर्स यांची टीम घटनास्थळी पोहोचली. प्राणीमित्र प्रदीप सुतार यांनी विहिरीत उतरून या गव्यास भुलीचे इंजेक्शन दिले. विहीर व परिसरातील गर्दी वनविभागाकडून हटविण्यात आली. त्यानंतर विहिरीनजीक असलेली लोखंडी जाळी कापून वाट मोकळी करण्यात आली. यानंतर हायड्रोलिक क्रेनच्या साह्याने या गव्याला विहिरीबाहेर काढण्यात आले. काही वेळातच रानगव्याने जंगलाकडे धूम ठोकली.
या बचावकार्यात महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनीलबाबा भाटिया, नगरसेवक कुमार शिंदे, अध्यक्ष अनिल केळगणे व टीम, वनविभागाचे अधिकारी दिलीप झगडे, लहू राऊत, सहदेव भिसे व वनविभाग टीम, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे कर्मचारी, तसेच मेटगुताड-अवकाळी ग्रामस्थ व्यवस्थापन समितीचे अनिल भिलारे, मोहन बावळेकर, आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
11 महाबळेश्वर