परप्रांतीय युवकाकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 05:11 PM2019-10-14T17:11:50+5:302019-10-14T17:14:47+5:30
सातारा येथील वाढे फाट्यावर परप्रांतीय युवकाकडून स्थानिक गुन्हे शाखेने एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली.
सातारा : येथील वाढे फाट्यावर परप्रांतीय युवकाकडून स्थानिक गुन्हे शाखेने एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली.
दीपक अंगर यादव (वय ३०, रा. अवथही, तहसील मुहमदाबाद, जि. गाझिपूर, राज्य उत्तर प्रदेश) असे अटक झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, वाढे फाट्यावर एक युवक पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमला शनिवारी दुपारी तेथे तत्काळ पाठविले.
राखाडी रंगाचा शर्ट, चॉकलेटी रंगाची पॅन्ट, सावळा रंग असलेला युवक तेथे संशयितरित्या फिरत होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्याने आपले नाव दीपक यादव असे सांगितले. त्याचा साथीदार सोनू यादव (रा. बस्कर,बिहार) हा तेथे येणार होता. त्याला हे पिस्टल देण्यात येणार होते.
तत्पूर्वीच दीपकला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे रोख रक्कम असा सुमारे ८५ हजार ३८० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र, सोनू यादव हा फरार झाला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, ज्योतिराम बर्गे, विनोद गायकवाड, मोहन नाचन, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, धीरज महाडिक, केतन शिंदे, मयूर देशमुख, वैभव सावंत यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.