Satara Crime: पोलिसांना टीप देतो म्हणून डोक्यात घातला कोयता, दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
By दत्ता यादव | Published: July 18, 2023 03:32 PM2023-07-18T15:32:43+5:302023-07-18T15:33:46+5:30
सातारा : पोलिसांना टीप देतो, या कारणावरून पानपट्टीचालकावर दोघांनी डोक्यात कोयता घालून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना ...
सातारा : पोलिसांना टीप देतो, या कारणावरून पानपट्टीचालकावर दोघांनी डोक्यात कोयता घालून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना दि. १६ रोजी रात्री बारा वाजता दत्तनगर, कोडोलीत घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर (३०७) खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
आकाश कापले (रा. दत्तनगर, ता. सातारा), निकेत पाटणकर (रा. चंदननगर, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महेश जालिंदर माने (वय ३७, रा. कारंडवाडी, ता. सातारा) हे पानपट्टी व्यावसायिक आहेत. ते पोलिसांना माहिती देतात, असा गैरसमज करून वरील दोघा संशयितांनी घरात घुसून काचेची बाटली त्यांच्या डोक्यात घातली. त्यानंतर कोयत्यानेही वार करण्यात आले.
यामध्ये महेश माने हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला. त्यानंतर वरील दोघा संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे हे करीत आहेत.