कोयनेचे दरवाजे दुसऱ्यांदा बंद; वीज गृहातूनच विसर्ग.. 

By नितीन काळेल | Published: August 31, 2024 08:13 PM2024-08-31T20:13:12+5:302024-08-31T20:13:21+5:30

पावसाची उघडझाप : आवक कमी; नवजाला ९, तर महाबळेश्वरला २ मिलिमीटरची नोंद 

Coyne's doors closed a second time; Discharge from the power house itself..  | कोयनेचे दरवाजे दुसऱ्यांदा बंद; वीज गृहातूनच विसर्ग.. 

कोयनेचे दरवाजे दुसऱ्यांदा बंद; वीज गृहातूनच विसर्ग.. 

लोकमत न्यूज नेटवर्क 
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू असल्याने धरणातही आवक कमी झाली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोयना धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा बंद करून विसर्ग थांबविण्यात आला. सध्या फक्त पायथा वीज गृहातूनच पाणी सोडण्यात येत आहे. तर २४ तासांत नवाजाला ९, तर महाबळेश्वर येथे २ मिलिमीटर पर्जन्यमान झाले.

जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत आहे. जुलै महिन्यात सर्वाधिक पर्जन्यमान झाले. पश्चिम भागात अनेक दिवस एकसारखा पाऊस होत होता. यामुळे सर्वच धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. परिणामी, धरणे ८० टक्क्यांवर भरली होती. तर पूर्व भागातही पावसाचे प्रमाण चांगले राहिले. यामुळे यंदा पाऊसमान चांगले राहिल्याने सर्वत्रच आनंदाचे वातावरण आहे. त्यातच ऑगस्ट महिन्याच्या मध्यानंतरही जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान झाले. विशेष करून पश्चिमेकडील सातारा, पाटण, वाई, जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यात अधिक पाऊस झाला. कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडीसारखी धरणे भरल्यातच जमा आहेत. त्यामुळे वर्षभराची चिंता मिटलेली आहे. त्यातच मागील आठवड्यात जोरदार झालेल्या पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. काही भागातच उघडझाप सुरू आहे. यामुळे धरणांत आवक कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ४ हजार ९७६ मिलिमीटर पाऊस पडला. तसेच मागील तीन महिन्यांत नवजा येथे ५ हजार ८४० आणि महाबळेश्वरला ५ हजार ६४९ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घटली. शनिवारी सकाळच्या सुमारास धरणात १० हजार ७२१ क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरण भरण्यासाठी पाण्याची गरज आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सर्व सहा दरवाजे सकाळी आठ वाजता बंद करण्यात आले. त्यामुळे विसर्ग थांबला आहे. सध्या धरणाच्या पायथा वीजगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून, त्यातून २ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर कोयना धरणात १०३.५२ टीएमसी पाणीसाठा झाला होता.

प्रमुख सहा धरणांत १४६ टीएमसी पाणीसाठा...
जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी ही मोठी धरणे आहेत. या धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सध्या या धरणांत एकूण १४५.९५ टीएमसी साठा झाला आहे. धोम धरणात १३.१६, बलकवडी ३.९२, कण्हेरमध्ये ९.८३, तारळीत ५.७५ आणि उरमोडी धरणात ९.८७ टीएमसी साठा आहे. ही धरणे भरल्यात जमा आहेत.

Web Title: Coyne's doors closed a second time; Discharge from the power house itself.. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.