दुर्गामूर्ती विसर्जनासाठीही क्रेनचा वापर

By admin | Published: October 23, 2015 10:13 PM2015-10-23T22:13:48+5:302015-10-24T00:30:53+5:30

दसरा उत्साहात : ढोलताशे अन ‘अंबामाता की जय’च्या घोषणांनी साताऱ्याचा आसमंत दणाणला

Cranes use for immersion of Durgamurti | दुर्गामूर्ती विसर्जनासाठीही क्रेनचा वापर

दुर्गामूर्ती विसर्जनासाठीही क्रेनचा वापर

Next

सातारा : ढोल-ताशांचा गजर आणि ‘अंबामाता की जय’च्या गगनभेदी गर्जनांनी साताऱ्यात दसऱ्याला दुर्गामूर्तींची शानदार मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत रंगलेली ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी प्रमुख रस्त्यांवर गर्दी केली होती. गणेशमूर्ती विसर्जन सोहळ्यात वापरण्यात आलेली क्रेन यावेळी सुद्धा उपयोगी ठरली.
शहरात एकूण ६४ मंडळांनी दुर्गामूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. रास-दांडिया आणि गोंधळगीतांनी भारलेले दहा दिवस संपून दसरा कधी उगवला हे सातारकरांना समजलेच नाही. शुक्रवारी सार्वजनिक मंडळांनी दुर्गामूर्तींची विसर्जन मिरवणूक काढली. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले कलाप्रकार, ढोलपथके, ढोली-बाजा आणि अन्य पारंपरिक वाद्यांच्या तालावर मिरवणुका निघाल्या. दहा दिवस देवीला अर्पण करण्यात आलेल्या साड्या, खण आणि नारळांचा लिलाव अनेक मंडळांमध्ये सकाळपासूनच सुरू होता. सायंकाळी सहानंतर राजपथावर प्रचंड गर्दी झाली होती. अनेक मंडळांनी फुलांची आरास करून मिरवणूकरथ आकर्षक पद्धतीने सजविला होता. साताऱ्यात नव्याने स्थापन झालेल्या ढोलपथकांनी आकर्षक ‘हात’ दाखवूनर् भक्तांची वाहवा मिळविली.
मोती चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. सिटी पोस्ट, देवी चौक, कमानी हौद, शेटे चौक, शनिवार चौक, पुन्हा मोती चौक, प्रतापगंज पेठ या मार्गावरून मिरवणुका राधिका रस्त्यावरील कृत्रिम तलावाकडे वळविण्यात आल्या. गणेश विसर्जन मिरवणुकीचाच मार्ग या मिरवणुकीसाठीही निश्चित करण्यात आला होता. मिरवणूक पाहण्याचा आनंद लुटतानाच सातारकर एकमेकांना सोने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देत होते. रात्री बारानंतर पारंपरिक वाद्यांचे निनादही थांबले आणि शिस्तीने मिरवणुकीची सांगता झाली. वसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावाचे व्यवस्थापन पालिका आणि पोलिसांच्या संयुक्त सहकार्यातून उत्तम प्रकारे करण्यात आले. बंदोबस्तासाठी सातारा शहर, सातारा तालुका आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले होते. (प्रतिनिधी)


पोलीस अधिकाऱ्याचे उद्धट वर्तन
सातारा पालिकेने मूर्ती विसर्जनासाठी राधिका रस्त्यावर कृत्रिम तलाव तयार केला आहे. याठिकाणी क्रेनच्या साह्याने मूर्तीचे विसर्जन केले जात होते. क्रेनच्या दोन्ही बाजूंला पालिका कर्मचारी व सुरक्षारक्षकांसाठी मचान तयार केले आहे. याठिकाणी कर्मचारी व सुरक्षारक्षकांपेक्षा लहान मुलं आणि इतरांचीच गर्दी होती. मचानावरील गर्दी पाहून सर्वसामान्य लोक किंवा लहान मुलं वर जाऊ लागली, तर तेथे कर्तव्य बजावत असलेले पोलीस निरीक्षक लांडगे परिसरातही कोणाला येऊ देत नव्हते. वरच्या लोकांनाही खाली उतरवा, असे लोक म्हटले तर ‘ती साहेबांची माणसं आहेत. तुम्हाला काय करायचंय ते करा, तुम्ही येथे थांबू नका,’ म्हणून लोकांशी उद्धट वर्तन करत होते. याप्रकारे अनेकांशी त्यांचे वाद झाले. गणेश विसर्जन मिरवणुकीतही याठिकाणी लांडगे यांचीच नेमणूक झाली होती. त्यावेळी दिवसभर त्यांना बसण्यासाठी एक खुर्ची व टोपी तसेच मोबाईल ठेवण्यासाठी स्वतंत्र खुर्च्यांची मागणी केली होती, अशी माहिती दोन्ही सोहळ्यावेळी उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधीने ‘लोकमत’शी बोलताना दिली.



‘लोकमत’च्या आवाहनास प्रतिसाद
गणेशोत्सवाच ‘लोकमत’ने ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा हाती घेतला होता. याविषयी मंडळांचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांचेच याविषयी एकमत झाले होते. तळ्यांचे प्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण टाळून उत्सव साजरे करण्याचा पायंडा पाडताना मंडळांनी ‘लोकमत’च्या आवाहनास भरभरून प्रतिसाद दिल्याचे गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवातही पाहायला मिळाले.



मंडळांचा सकारात्मक दृष्टिकोन
नवरात्रोत्सव आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा एकाच वेळी असतात. यावर्षी सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांनी याचे पक्के भान राखल्याचे पाहायला मिळाले. दहा दिवसांत ध्वनिवर्धकांचा आवाज मर्यादित ठेवण्यात आला. विसर्जन मिरवणुकीतही डीजेसारख्या दणदणाटी यंत्रणांना फाटा देऊन पारंपरिक वाद्यांचा वापर केला.

Web Title: Cranes use for immersion of Durgamurti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.