अपघातग्रस्त गाडी घरात घुसली, पिंगळी खुर्दमध्ये थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 12:20 PM2021-05-27T12:20:30+5:302021-05-27T12:24:56+5:30
Accident Satara : सातारा-लातूर महामार्गावर अपघातग्रस्त वाहन रस्त्यालगतच्या घरात घुसल्याची घटना पिंगळी खुर्द (ता. माण) येथे घडली. रस्त्यामुळे धोकादायक बनलेल्या या घराजवळ अखेर अनर्थ घडलाच. अपघातावेळी घरात असलेल्या गौतम रणपिसे यांच्यासह कुटुंबीय बचावले. मात्र यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले आहे.
म्हसवड : सातारा-लातूर महामार्गावर अपघातग्रस्त वाहन रस्त्यालगतच्या घरात घुसल्याची घटना पिंगळी खुर्द (ता. माण) येथे घडली. रस्त्यामुळे धोकादायक बनलेल्या या घराजवळ अखेर अनर्थ घडलाच. अपघातावेळी घरात असलेल्या गौतम रणपिसे यांच्यासह कुटुंबीय बचावले. मात्र यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले आहे.
महामार्गाच्या कामामुळे रस्ता रुंद झाला आहे. याशिवाय जमिनीपासून रस्त्याची उंची वाढल्याने पिंगळी खुर्द येथील कांबळे वस्तीजवळ घरांची उंची रस्त्याला समांतर झाली आहे. याठिकाणी संरक्षक कठडे नसल्याने धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी अंधारामुळे ही घरे दिसूनही येत नाहीत. परिणामी येथे मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त होत होतीच. या रस्त्यावरील पहिल्याच अपघाताने ही भीती येथील रणपिसे कुटुंबीयांनी अनुभवली आणि सर्वांच्याच मनाचा थरकाप उडाला.
व्हॅन आणि छोटा हत्ती यांच्यात हा अपघात झाला. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या छोटा हत्ती वाहनाने अचानक वळण घेत असतानाच साताऱ्याकडून येणाऱ्या व्हॅनला जोरदार धडक दिली. या धडकेच्या आवाजाने रणपिसे कुटुंबाने घराबाहेर धाव घेतली. याच दरम्यान व्हॅन गाडी थेट घराला जाऊन धडकली. याच वेळी प्रसंगावधान राखत रणपिसे कुटुंबीय सुखरूप सुरक्षित जागी पळाल्याने बचावले. मात्र वाहनाच्या धडकेमुळे घराचा बहुतांशी भाग कोसळून मोठे नुकसान झाले.
गौतम रणपिसे यांची परिस्थिती खूप हलाखीची असून महामार्गाच्या कामपूर्वीच त्यांनी घरकुल योजनेतून घर व शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले होते.अपघातामुळे मात्र आता हे कुटुंब उघड्यावर आले आहे.