भूकमुक्त भारत बनवायचाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:01 PM2018-04-15T23:01:52+5:302018-04-15T23:01:52+5:30
कºहाड : ‘योगशास्त्रात जसे योगासनांना महत्त्व आहे. तसेच निरोगी शरीरासाठी योग्य आहारही महत्त्वाचा आहे. कारण त्यामुळे दीर्घायुष्य लाभत असते. आज भारतात अतिरिक्त आहारामुळे खूप व्यक्ती आजारी पडतात. तर काही भुकेमुळे मृत्यू पावतात. या देशातील एकही व्यक्ती आजारी व भुकेने मरता कामा नये, असा देश बनवायचे स्वप्न पाहतो आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ असे मत योगगुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केले.
कºहाड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्या वतीने तीन दिवसीय योगचिकित्सा व ध्यान शिबिर सुरू आहे. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी रविवारी महिला महासंमेलन व विशेष शिबिर पार पडले. याप्रसंगी योगगुरू रामदेव बाबा बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार राजेंद्र शेळके, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पतंजली योगपीठाचे केंद्र्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य, पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी बापू पाडळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्वेता सिंघल म्हणाल्या, ‘योगगुरू रामदेव बाबा यांचे सातारा जिल्ह्यातील कºहाड येथे तीन दिवसीय योगचिकित्सा व ध्यान शिबिर होत आहे. योगासनाबाबत व योगशास्त्रातील महत्त्वाच्या गोष्टींविषयी रामदेव बाबा या ठिकाणी येऊन नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. योगशास्त्राला अनन्यसाधारण महत्व आहे.’
रामदेव बाबा म्हणाले, ‘आजच्या काळात कुटुंबातील व्यक्ती व प्रत्येकामध्ये ताणतणाव वाढत चालला आहे. याचे कारण म्हणजे नकारात्मक दृष्टिकोनातून विचार करणे होय. आयुष्य हे ईश्वराने दिलेली अमूल्य देणगी आहे. त्याला आनंदाने व प्रसन्नतेने जगा. सर्व दु:ख, प्रश्न बाजूला ठेवून हसत राहण्याचा प्रयत्न करा. येणाºया संकटांना सकारात्मकतेने विचार करून सामोरे जा. म्हणजे प्रत्येक संकट, प्रश्न तुम्हाला सहजरितीने सोडविता येतील.’
महिलांनी आपल्या आहाराबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांनी नियमित योगासने, शुद्ध आहार तसेच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगावे. नियमित योगासने करावीत. योगासने करणारी व्यक्ती नेहमी आरोग्यदायी जीवन जगत असते. तिला दीर्घायुष्य लाभले. सध्या शरीरातील जाडीमुळे अनेक आजार व विकारांना सामोरे जावे लागत आहे. हे टाळण्यासाठी योगासने व आहारातील बदल यांचा नियमित अवलंब करावा.
यावेळी रामदेव बाबा यांनी उपस्थित हजारो महिलांना योगसाधना व आहाराविषयी मार्गदर्शन करण्याबरोबर भक्तीसंगीताच्या सुरावटींवर योगासनांची प्रात्यक्षिकेही सादर करून दाखविली.
महिला महासंमेलन व विशेष शिबिरात कºहाडसह परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या. प्रतिष्ठित मान्यवरांनीही शिबिराला उपस्थिती योगसाधना केली.
नियमित योगाने कॅन्सरवरही मात
दमा, कॅन्सर, लठ्ठपणा यासारख्या व्याधी टाळायच्या असतील तर नियमितपणे योग करणे आवश्यक आहे. योगामुळे या गोष्टींवर नियंत्रण आणता येते. त्यामुळे शरीर निरोगी राखायचे असेल तर नियमित योगा करावा, असेही रामदेव बाबा यांनी आयोजित विशेष शिबिराप्रसंगी सांगितले.