उदयनराजेंवर षडयंत्र रचून गुन्हा

By admin | Published: April 28, 2017 12:54 AM2017-04-28T00:54:56+5:302017-04-28T00:54:56+5:30

समर्थकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : खोटे गुन्हे रचणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी

Creating a plot against Udayan Raj | उदयनराजेंवर षडयंत्र रचून गुन्हा

उदयनराजेंवर षडयंत्र रचून गुन्हा

Next



सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर षडयंत्र रचून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे खोटे गुन्हे रचणाऱ्यांच्या गेल्या महिनाभरातील वर्तणुकीची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच संबंधितांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी खासदार उदयनराजे समर्थकांकडून करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘संबंधित गुन्हा दि. १८ मार्च रोजी घडला तर गुन्हा नोंद दि. २३ मार्चला झाला. हा गुन्हा नोंद करण्यासाठी राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी संबंधितांवर आपल्या पदाचा गैरवापर करून गुन्हा दाखल करण्यासाठी प्रचंड दबाव टाकल्याची निश्चित व ठोस माहिती प्राप्त झाली आहे. त्याप्रमाणे पुरावेही आहेत. त्यातच रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ‘आजपर्यंत दोन कामाला लावले आहेत, दोन अजून बाकी आहेत,’ अशी टिप्पणी केल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, सातारा जिल्ह्याची शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणणारी आहे. विधान परिषदेच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीच चिथावणीखोर वक्तव्य करून शांतता, सुव्यवस्था धोक्यात आणत असेल तर अशा व्यक्तीला अशा पदावर बसण्याचा कायद्याने कोणताही हक्क नाही. अशा व्यक्तीच्या वक्तव्याची पोलिस प्रशासनाने माहिती घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचा गुन्हा तातडीने दाखल करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित वक्तव्याची राज्य शासनाने दखल घेऊन अशा बेजबाबदार व्यक्तीस
त्या पदावरून तातडीने निलंबित करावे.
रामराजे यांच्या उद्गारानुसार दोनपैकी एक व्यक्ती म्हणजे उदयनराजे भोसले आणि दुसरी व्यक्ती आमदार जयकुमार गोरे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात समाजसेवा करणाऱ्या सर्वच लोकप्रतिनिधींमध्ये निश्चित स्वरुपात भीती निर्माण झाली आहे. असे वक्तव्य करून रामराजे यांनी लोकशाहीला काळिमाही फासण्याचे काम केले आहे. १९९९ मध्ये उदयनराजे भोसले यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे कारस्थान अभयसिंहराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रचले होते. त्यावेळी सुमारे २२ महिन्यांपेक्षा अधिक काळ खासदार उदयनराजे भोसले यांना विनाकारण प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. मात्र, न्यायव्यवस्थेकडून याबाबत योग्य निवाडा दिला गेला होता.
षडयंत्र रचून त्याद्वारे एखाद्याचे राजकीय खच्चीकरण करणे यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. असले घृणास्पद प्रकार राज्याच्या विधिमंडळातील अति उच्चपदस्थ व्यक्ती करीत असेल तर त्यांनी त्या पदावर राहण्याचा नैतिक हक्क गमावला आहे.
या मोर्चात नगराध्यक्षा माधवी कदम, सुनील काटकर, अ‍ॅड. डी. जी. बनकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, किशोर शिंदे, सुहास राजेशिर्के, सुनील सावंत, बाळासाहेब गोसावी आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Creating a plot against Udayan Raj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.