मुलांमध्ये वैज्ञानिक जाणिवा निर्माण करणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:14 AM2021-02-28T05:14:56+5:302021-02-28T05:14:56+5:30

ज्ञान ग्रहण करण्यासाठी मुलं शाळेत जातात. त्यांच्यात अनेक गोष्टींबद्दल कुतूहल असतं. विज्ञानाच्या तासाला प्रयोगशाळेत नेलं जातं. तिथं अनेक वस्तू ...

Creating scientific awareness in children | मुलांमध्ये वैज्ञानिक जाणिवा निर्माण करणारे

मुलांमध्ये वैज्ञानिक जाणिवा निर्माण करणारे

Next

ज्ञान ग्रहण करण्यासाठी मुलं शाळेत जातात. त्यांच्यात अनेक गोष्टींबद्दल कुतूहल असतं. विज्ञानाच्या तासाला प्रयोगशाळेत नेलं जातं. तिथं अनेक वस्तू टेबलवर ठेवलेल्या असतात. पण, ती फुटतील म्हणून मुलांना हातच लावू दिला जात नाही. मग, मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा मिळणार? हा प्रश्न डोक्यात घोळत असल्याने साताऱ्यातील विक्रम वाळिंबे यांनी मुलांसाठी ‘अभ्यासघर’ सुरू केलं. येथे दरआठवड्याला विज्ञानाचे मोफत धडे दिले जातात.

सातारा तालुक्यातील कुमठे येथील विक्रम वाळिंबे यांनी कृषी शाखेतून पदवी संपादन केली. चार ते पाच वर्षे त्यांनी शेती केली, पण त्यांचा कल भावी पिढी घडविण्याकडेच जास्त होता. गावातील मुलं घरी येत होती. त्यांना ते शिकवत असत. हळूहळू मुलं वाढत गेली. ती वाळिंबे यांच्या घरी येऊन अभ्यास करत, खेळत असत. ज्ञानदान करण्याबाबत वाळिंबे यांच्यात रुची निर्माण झाली. सध्या ते शिक्षकांचे प्रशिक्षण घेतात. काही शाळांत जाऊन शिकवत आहेत.

शिक्षण शाखेची कोणतीही पदवी किंवा पदविका नसताना वाळिंबे यांनी पुण्यातील ज्ञानप्रबोधन विद्यालयात दोन वर्षे शिकवले अन् साताऱ्यात आल्यावर त्यांनी २००८ मध्ये ‘अभ्यासघर’ची स्थापना केली. शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा देणारी आठ मुलं येत होती. ही संख्या पुढे चाळीसवर गेली. यामध्ये मुलांमध्ये कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे देत होते.

विज्ञान समजून घेण्याची आवड असलेल्या मुलांसाठी दररविवारी मोफत वर्ग घेत असतात. विविध शाळांतील तब्बल ८० ते १०० मुलं येतात. त्यांनी मुलांना विज्ञान चांगले समजावे म्हणून असंख्य उपकरणे जमविली आहेत. त्यावर प्रयोग करून दाखविले जातात. त्यांना दैनंदिन जीवनातील लहानलहान घटनांमधील विज्ञान, पक्कड, पाना कसे पकडायचे, हे शास्त्र शिकवत असतात. अगदी घरात आजीबाई लोणचं करताना मुलं पाहतात, पण त्यामध्येही शास्त्र दडलेले आहे. त्यावर प्रकिया कशी घडते, हे सांगितले जाते. मुलांमध्ये विज्ञानाच्या प्रसारासाठी करत असलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन स्काउट-गाइडचा बालकार्य सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

खुल्या प्रयोगशाळेची सहल

साताऱ्याला निसर्गाचे चांगले वरदान लाभले आहे. खुल्या निसर्गात फिरायला गेल्यास मुलांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो, हे जाणून मुलांची सहल काढली जाते. यामध्ये मुलांना झाडं, वेली, फुलं, सूर्य यांची माहिती दिली जाते. यामध्ये पालकांनाही सहभागी करून घेतलं जातं.

कोट :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे होते. त्यामुळे वर्षभर त्यांना भेटता आले नाही. तसेच दरवर्षी फेब्रुवारीत विज्ञान दिन साजरा करतो. पण, यंदा कोरोनाचे संकट असल्याने मुलांना ‘अभ्यासघर’ला येता आलं नाही, याची खंत वाटते.

- विक्रम वाळिंबे, शिक्षक, सातारा

फोटो

२७विक्रम वाळिंभे

साताऱ्यातील विक्रम वाळिंबे हे ‘अभ्यासघर’मध्ये येणाऱ्या मुलांना विज्ञानाचे प्रयोग, निसर्गाचे निरीक्षण करून विज्ञान जाणून घेतात.

- जगदीश कोष्टी, सातारा

Web Title: Creating scientific awareness in children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.