साताऱ्यात नवीन महाबळेश्वरची निर्मिती; आचारसंहिता संपताच प्रारूप विकास योजनेला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 10:11 AM2024-05-31T10:11:19+5:302024-05-31T10:12:52+5:30
राज्यातील प्रमुख गिरीस्थानांमध्ये समावेश असलेल्या महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी पसंती असते
अमर शैला
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाशेजारीच नवीन महाबळेश्वर गिरीस्थान निर्माण करण्याच्या प्रकल्पाने गती घेतली आहे. या प्रकल्पातील २३५ गावांपैकी ५८ गावांचा बेस मॅप आणि भूवापर नकाशा तयार झाला आहे. तर उर्वरित १७७ गावांचा लिडार सर्व्हे आणि जमीन पडताळणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता संपताच आता प्रारूप विकास योजना तयार करण्याच्या कामाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) सुरुवात केली जाणार आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून २०१९ मध्ये नियुक्ती केली होती.
राज्यातील प्रमुख गिरीस्थानांमध्ये समावेश असलेल्या महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी पसंती असते. त्यातून येथील पर्यटकांची गर्दी वाढू लागल्याने महाबळेश्वरवर येणारा ताण कमी करण्यासाठी नवीन गिरीस्थान विकसित करण्याची गरज निर्माण झाली होती.
कोयना बॅक वॉटर आणि परिसरातील तब्बल २३५ गावांचा विकास साधून नवीन महाबळेश्वर बसविले जाणार आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील ३४, पाटण तालुक्यातील ९५, जावळी तालुक्यातील ४६ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ६० गावांचा समावेश नवीन महाबळेश्वर प्रकल्पात करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातील सुमारे ७४८ चौरस किमी क्षेत्रासाठी ही योजना तयार केली जात असून सांगली जिल्ह्याच्या हद्दीपासून ते महाबळेश्वरपर्यंत हा परिसर विस्तारला आहे. सह्याद्री डोंगररांगांच्या उत्तर दक्षिणेला समुद्र सपाटीपासून सुमारे १२०० मीटर उंचीवर आहे. या भागातून सोळशी, उरमोडी, कांदाटी या उपनद्या वाहतात. तसेच कोयनेचे बॅकवॉटर आहे. यामुळे हा परिसर हिरवागार आणि नयनरम्य आहे. त्याचबरोबर घनदाट जंगल, वन्यजीव, धबधबे, तलाव, ऐतिहासिक वास्तू यांची मोठी देण लाभली आहे. परिणामी गिरीस्थान म्हणून विकसित होण्याच्या दृष्टीने हा परिसर परिपूर्ण आहे.
आराखड्यात समाविष्ट घटक
- सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण, संवर्धन आणि जीर्णोद्धार.
- राखीव जागा, वन्यजीव अभयारण्ये आणि संवेदनशील स्थळांभोवती बफर झोन किंवा कनेक्टर आणि स्थलांतर कॉरिडॉर तयार करून दुर्मीळ प्रजातींचे संवर्धन करणे.
- कास पठारावर विविध प्रकारच्या मोसमी वन्य फुलांचे आणि स्थानिक फुलपाखरांच्या प्रजातींचे संरक्षण करणे
- शिव सागर तलाव, उरमोडी, तापोळा, कोयना बॅक वॉटर परिसराला सुपीक हिरवेगार आणि नयनरम्य बनवणे.
प्रकल्पात समाविष्ट गावे
- सातारा तालुका- ३४
- पाटण तालुका- ९५
- जावळी तालुका- ४६
- महाबळेश्वर तालुका- ६०
या बेस मॅपचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रारूप विकास योजना तयार करण्याबाबतचा इरादा जाहीर करण्यात येईल. त्यानंतर विद्यमान जमीन वापर नकाशा, प्रारूप विकास योजना तयार करून नागरिकांच्या हरकती / सूचनांकरिता प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे.
- अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी