गोरे बंधूंसह २५० कार्यकर्त्यांवर गुन्हे !
By admin | Published: March 20, 2015 11:45 PM2015-03-20T23:45:23+5:302015-03-20T23:49:49+5:30
आंधळी-दहिवडी धुमश्चक्री : फरार संशयितांचा शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर
गोंदवले : आंधळी दगडफेकप्रकरणी आमदार जयकुमार गोरे यांच्यासह शंभरपेक्षा जास्त व शेखर गोरे यांच्यासह शंभरपेक्षा जास्त अशा एकूण दोनशे ते अडीचशे जणांवर दंगल माजविणे, मारामारी करणे, गंभीर जखमी करणे, शासकीय नोकरावर हल्ला करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, शासकीय आदेशाचा भंग करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आंधळी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पदाधिकारी निवडीवरून आमदार गोरे व शेखर गोरे गटांत मोठा वाद निर्माण झाला होता. निवडणूक निर्णय अधिकारी अनुपस्थितीत राहिल्याने पदाधिकारी निवडीची निवडणूकच पुढे ढकलावी लागली होती. त्यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीचे पर्यवसान तुफान दगडफेकीत झाले. यात दोन पोलिसांसह अनेक कार्यकर्ते जखमी झाले. पोलिसांच्या वाहनांसह खासगी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तब्बल अर्धा तास
तुफान दगडफेक झाल्यानंतर
जमाव पांगविण्यात पोलिसांना यश आले.
या घटनेमुळे आंधळी, दहिवडीसह संपूर्ण माण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज दिवसभर पोलिसांकडून संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे करीत आहेत. (वार्ताहर)
विविध कलमाखाली गुन्हे
माण तालुक्यातील आंधळी व दहिवडी येथे झालेल्या धुमश्चक्री व मारहाणप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये १४३, १४७, १४८, १४९, ३३२, ३३३, ३२६, ४२७, ५०६ या कलमांचा समावेश आहे. दरम्यान शुक्रवारी दहिवडी पोलिसांकडून संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
गुरुवारी नेमणुकीवर असलेले निवडणूक निर्णय अधिकारी ए. पी. तायडे यांचा अद्याप पत्ता लागलेला नसल्याने त्यांच्या जागेवर राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करुण निवडणूक प्रक्रीया पूर्ण करावी, असा आदेश दिल्याचे सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत इमेल या कार्यालयाला मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.