पोलीस व्हॅनला धडक देणाऱ्या कारचालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:56 AM2020-02-21T11:56:02+5:302020-02-21T11:57:49+5:30
वाढे (ता. सातारा) गावच्या हद्दीत महामार्गावर उभा असलेल्या पोलीस व्हॅनला भरधाव कारने जारेदार धडक दिली. याप्रकरणी कार चालक अल्ताफ अस्लम शेख (रा. अशोकनगर, कल्याण, मुंबई) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास झाला.
सातारा : वाढे (ता. सातारा) गावच्या हद्दीत महामार्गावर उभा असलेल्या पोलीस व्हॅनला भरधाव कारने जारेदार धडक दिली. याप्रकरणी कार चालक अल्ताफ अस्लम शेख (रा. अशोकनगर, कल्याण, मुंबई) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पोलीस कर्मचारी गुडालोड हे मंगळवार दि. १८ रोजी रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील पोलीस व्हॅन महामार्गाच्याकडेला उभी करून वाहतूक नियमन करत होते.
शिवजयंतीसाठी गडकिल्ल्यांवर जाणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांची महामार्गावर गर्दी होती. अशातच एक ट्रक महामार्गावर थांबल्याने गुडालोड त्या ट्रकचालकाला महामार्गावर न थांबण्याचे सांगत होते. याचवेळी अल्ताफ शेखने त्याच्या ताब्यातील (एमएच १४ पी ६२२७) कारने पोलीस व्हॅनला जोरदार धडक दिली. यात व्हॅनच्या पुढील भागाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
गुडालोड यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अल्ताफ शेखवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी जगदीश साईनाथ गुडालोड (रा. पोलीस वसाहत, सातारा) यांनी फिर्याद दिली असून, सहायक फौजदार निवास मोरे हे पुढील तपास करत आहेत.