कारागृहात मुलाला मोबाइलचे सिमकार्ड देणाऱ्या बापावर गुन्हा

By दत्ता यादव | Updated: March 6, 2025 21:35 IST2025-03-06T21:35:37+5:302025-03-06T21:35:52+5:30

कपडे तपासताना सिमकार्ड सापडले; पोलिसांकडून कसून तपास सुरू

Crime against father who gave mobile SIM card to son in prison | कारागृहात मुलाला मोबाइलचे सिमकार्ड देणाऱ्या बापावर गुन्हा

कारागृहात मुलाला मोबाइलचे सिमकार्ड देणाऱ्या बापावर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : चोरीच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या मुलाला मोबाइलचे सिमकार्ड देणाऱ्या बापावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता उघडकीस आली.
राजू उत्तम निकम (वय ५०, रा. माहुली, ता. खानापूर, सांगली), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

राजू निकम यांचा मुलगा शुभम निकम याला चोरीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याची जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून तो कारागृहात आहे. त्याला भेटण्यासाठी त्याचे वडील राजू निकम हे आले होते. त्यांनी मुलाची कपडे कारागृहात दिली. कारागृहातील मुख्य दरवाजाजवळ कर्मचाऱ्यांनी कपड्यांची तपासणी केली असता पॅन्टच्या खिशामध्ये त्यांना मोबाइलचे सिमकार्ड सापडले. त्यानंतर कारागृहातील कर्मचारी राकेश पवार यांनी दि. ६ रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी बंदिवान शुभम आणि त्याचे वडील राजू निकम यांच्यावरही गुन्हा दाखल केला. हवालदार महेंद्र पाटोळे हे अधिक तपास करीत आहेत.

कारागृहात मोबाइल तर नाही ना..

मुलासोबत बोलता यावे म्हणून वडिलांनी कारागृहात मुलाला सिमकार्ड दिले. याचा अर्थ कारागृहात मोबाइल तर नाही ना, अशीही शंका पोलिसांना आहे. परंतु कारागृहात जॅमर असतानासुद्धा मोबाइल सुरू कसा राहील, असाही प्रश्न उपस्थित होतोय. तर दुसरीकडे कपडे धुतल्यानंतर चुकून सिमकार्ड कपड्यातून गेले नसेल ना किंवा सापडलेले कार्ड बंद असेल तर या गुन्ह्याची तीव्रता कमी होईल. परंतु जर का हे कार्ड पूर्वी कोणी वापरत असेल व सध्या ते सुस्थितीत असेल तर नक्कीच कुठेतरी पाणी मुरतेय, हे सिद्ध होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: Crime against father who gave mobile SIM card to son in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.