महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या प्रदेशाध्यासह पन्नासजणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:39 AM2021-03-20T04:39:44+5:302021-03-20T04:39:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरवळ : पळशी येथील कंपनी व्यवस्थापकाला स्थानिक कामगार भारतीवरून दमदाटी करण्यात आली. धमकी देऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरवळ : पळशी येथील कंपनी व्यवस्थापकाला स्थानिक कामगार भारतीवरून दमदाटी करण्यात आली. धमकी देऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी तसेच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोनाविषयक दिलेला आदेश मोडल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या प्रदेशाध्यक्षासह ५० जणांविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पळशी येथे एक खासगी कंपनी असून, त्यामध्ये सत्यजित मकरंद राणे (वय ४८, रा. पुणे) हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. सत्यजित राणे हे कंपनीमध्ये असताना पळशी येथील अश्विन गोळे, आविष्कार भरगुडे हे तेथे आले. ‘आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्ह्याचे पदाधिकारी असून, आपल्याला कामगार भरतीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन राणे हे भेटणार आहेत,’ असे सांगितले. त्यावेळी राणे यांनी चर्चेची तयारी दाखविली. यादरम्यान, शुक्रवार, दि. १२ रोजी दुपारी दीडच्या सुमारास कंपनीमध्ये अंदाजे ५० जणांचा जमाव कंपनीच्या गेटवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे घेऊन सुरक्षारक्षकांना न जुमानता थेट कंपनीमध्ये घुसले.
यावेळी सत्यजित राणे यांनी संबंधितांशी चर्चा करीत असताना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन राणे याने ‘स्थानिक कामगारांना ब्रेक का देता. बेरोजगार मुलांना नोकरीमध्ये स्थान देत नाही. कायम का करीत नाही, असे प्रश्न करीत दोन दिवसांमध्ये कंपनी मालकांची भेट घडवून आणायची. ती न आणल्यास नोकरीचा राजीनामा द्यायचा, अन्यथा आंदोलन करून कंपनी चालू देणार नाही,’ अशी धमकी दिली. व्यवस्थापक सत्यजित राणे यांनी ‘ठीक आहे,’ असे म्हणताच गजानन राणे याने धमकी देत दमदाटी करीत मनसेच्या घोषणा देत कंपनीच्या आवारात बेकायदेशीर सभा घेत भाषणबाजी करीत संबंधितांनी सोबत आणलेले मनसेचे झेंडे कंपनीच्या गेटवर लावले.
यावेळी व्यवस्थापक सत्यजित राणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा प्रदेशाध्यक्ष गजानन राणे, अश्विन गोळे, आविष्कार भरगुडे, मयूर चव्हाण, निखिल भरगुडे, ओंकार भरगुडे, ज्ञानेश्वर कदम, आदिनाथ भरगुडे, मयूर भरगुडे, गजानन स. भरगुडे, गजानन ब.भरगुडे, आकाश चव्हाण, अक्षय गोळे व तुषार भरगुडे यांच्यासह ५० जणांविरुद्ध दमदाटी, धमकी देऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी तसेच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे तपास करीत आहेत.