सव्वा किलो सोने लंपास करणाऱ्या सराफावर गुन्हा
By admin | Published: November 2, 2014 12:35 AM2014-11-02T00:35:19+5:302014-11-02T00:40:29+5:30
कऱ्हाडात खळबळ : लुटीचा बनाव अकरा महिन्यांनंतर उघड
कऱ्हाड : तब्बल सव्वा किलो सोने गायब केल्याप्रकरणी कऱ्हाडातील सराफावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अकरा महिन्यांनंतर हा प्रकार उघडकीस आला असून, घटनेमुळे कऱ्हाडच्या सराफ व्यावसायिकामध्ये खळबळ उडाली आहे़
मदन रामदास घाडगे (रा़ सिध्दी कॉर्नर, सैदापूर) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील डुबल गल्लीत राहणाऱ्या भरत केराप्पा लेंडवे हे सोन्या-चांदीच्या आटणीचा व्यवसाय करतात. गत दहा वर्षांपासून त्यांच्या मामाचा मुलगा शंकर धोंडिराम शिणगारे यांच्या रामेश्वरी रिफायनरी या आटणीच्या दुकानात ते कामास आहेत. या व्यवसायातूनच त्यांची मदन घाडगे याच्याशी ओळख झाली. मदन घाडगे हा आटणी व्यावसायिकांकडून आटणी केलेले सोने, चांदी व इतर दागिने घेऊन त्याची विक्री करतो. १३ डिसेंबर २०१३ रोजी मलकापूर येथील मनीष ज्ञानदेव बामणे हे त्यांच्याकडील गंठण, वेडणी, नेकलेस घेऊन रामेश्वरी रिफायनरीमध्ये आले. दागिने आटणी करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार दागिन्यांची आटणी केल्यानंतर १ हजार १८ ग्रॅम वजनाचे चोख सोने निघाले. बामणे यांनी आटणी केलेले सोने विक्री करायचे असल्याचे भरत लेंडवे यांना सांगितले. त्यानुसार लेंडवे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे एजंट मदन घाडगेला बोलविले. बामणे यांचे १ हजार १८ ग्रॅम व दुकानातील ११० ग्रॅम असे १ हजार १२८ ग्रॅम वजनाचे सोने विक्री करण्यासाठी मदन घाडगेकडे देण्यात आले. त्याचवेळी घाडगेने विट्यातील एका व्यापाऱ्यास सर्वांसमोर फोन करून सौदा फायनल केला. १४ डिसेंबर २०१३ रोजी घाडगे संबंधित सोने घेऊन निघून गेला. त्यानंतर दुसऱ्या दुवशी भरत लेंडवे यांनी त्याला फोन केला. मात्र, त्याने फोन घेतला नाही. त्यानंतर वारंवार घाडगेशी संपर्क साधण्याचा लेंडवे यांनी प्रयत्न केला. अखेर सायंकाळी घाडगेने फोन घेऊन आपल्याला चोरट्यांनी लुटल्याचे लेंडवे यांना सांगितले. तसेच आपण सह्याद्री रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे भरत लेंडवे तत्काळ सह्याद्री रुग्णालयात गेले. त्यांनी घाडगेच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र, सोन्याबाबत विचारण्याची ही वेळ नसल्याने ते तसेच परत घरी निघून आले. काही दिवसांनंतर डिस्चार्ज घेऊन भरत घाडगे घरी आल्यानंतर लेंडवे यांनी वेळोवेळी सोन्याबाबत विचारणा केली. मात्र, उडवाउडवीची उत्तरे देत होता. अखेर भरत लेंडवे यांनी पोलीस उपअधीक्षकांना अर्ज दिला. (प्रतिनिधी)