विनापरवाना फलकप्रकरणी नगराध्यक्षांच्या पतीवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:43 AM2021-07-14T04:43:46+5:302021-07-14T04:43:46+5:30
कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या विजयाबद्दल उमेश शिंदे यांनी हा फलक लावला होता. मात्र, विनापरवाना लावलेल्या या फलकामुळे सार्वजनिक ...
कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या विजयाबद्दल उमेश शिंदे यांनी हा फलक लावला होता. मात्र, विनापरवाना लावलेल्या या फलकामुळे सार्वजनिक ठिकाणाचे विद्रुपीकरण झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आरोग्य निरिक्षक मिलिंद शिंदे यांना २ जुलै रोजी शहरात पाहणी करून विनापरवाना फलकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मिलिंद शिंदे दोन कर्मचाऱ्यांसह शहरात पाहणी केली. त्यावेळी त्यांना बनपूरकर कॉलनी परिसरात सहकार पॅनेलच्या विजयाचा आठ बाय दहा फूट विनापरवाना फलक दिसला. डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश आनंदराव शिंदे यांनी तो फलक लावल्याचे दिसून आले. यासंदर्भात त्यांना विनापरवाना फलक लावल्याबद्दल नोटीस बजावली होती. मात्र, आजपर्यंत त्याचा खुलासा उमेश शिंदे यांनी केला नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी विद्रुपीकरण केले म्हणून तक्रार दाखल करण्यात आली. याबाबत आरोग्य निरिक्षक मिलिंद शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.