corona virus -कोरोना संशयिताचे नाव व्हायरल करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 04:48 PM2020-03-16T16:48:29+5:302020-03-16T16:51:48+5:30
अबुधाबीवरून साताऱ्यात आलेल्या तीसवर्षीय कोरोना संशयिताचे नाव सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : अबुधाबीवरून साताऱ्यात आलेल्या तीसवर्षीय कोरोना संशयिताचे नाव सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातार जिल्ह्यातील रहिवासी असलेला संबंधित कोरोना संशयित युवक काही दिवसांपूर्वी मुंबई येथे आला. त्यानंतर तो आपल्या गावी साताऱ्यात आला. शनिवारी मध्यरात्री त्याला खोकला, ताप, सर्दी आणि छातीत दुखू लागले. त्यामुळे घरातल्यांनी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाला याची माहिती दिली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित युवकाला रुग्णालयात घेऊन येण्याचा सल्ला दिला.
नातेवाइकांनी त्याला शनिवारी रात्री उपचारासाठी दाखल केले. त्याचे नमुनेही पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात अले आहेत. त्याचे नाव, पत्ता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लिहून घेतला होता. मात्र, त्याचे नाव सोशल मीडियावर सोमवारी सकाळी व्हायरल झाली.
या प्रकाराची काही नागरिकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. पोलिसांनीही तत्काळ अज्ञातावर गुन्हा दाखल केला असून, सिव्हिलमधील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली जात आहे.
दरम्यान, संबंधित कोरोना संशयिताचा अहवाल अद्याप जिल्हा शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला नसून मंगळवारी दुपारपर्यंत अहवाल येण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.