व्यापाऱ्यांकडून १५ लाखांची खंडणी उकळणाऱ्या सहाजणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:43 AM2021-05-25T04:43:54+5:302021-05-25T04:43:54+5:30
फलटण : ‘भेंडी खरेदीसाठी मोठा व्यापारी आला आहे, त्याला तुमच्याकडून भेंडी घ्यायची आहे,’ असे सांगून दुसरीकडे नेत त्यास मारहाण ...
फलटण : ‘भेंडी खरेदीसाठी मोठा व्यापारी आला आहे, त्याला तुमच्याकडून भेंडी घ्यायची आहे,’ असे सांगून दुसरीकडे नेत त्यास मारहाण करून त्यांचे कपडे काढून महिलेबरोबर अश्लील फोटो काढले. त्यानंतर त्याआधारे ब्लॅकमेल करत १५ लाख ५० हजार रुपयांची खंडणी वसूल करण्यात आली. याप्रकरणी सहाजणांविरोधात फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील तिघांना अटक केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, फलटण तालुक्यातील तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे की, तक्रारदार १५ मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास हे त्यांच्या दुकानाच्या गाळ्यात बसलेले होते. तेव्हा अजित घोलप (रा. नागेश्वरनगर चौधरवाडी, फलटण) याने ‘मानस प्लाझा बिल्डिंग लक्ष्मीनगर, फलटण येथे एक भेंडीचा व्यापारी आलेला आहे, तो भेंडी घेणार आहे,’ असे सांगून त्याच्या मोटारसायकलवरून फिर्यादी यांना घेऊन गेला. तेथे पोहोचताच एक मुलगी, राजू बोके, मनोज हिप्परकर, रोहित भंडलकर (रा. फलटण) हे तेथे बसलेले होते. त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करून त्यांचे कपडे काढून मुलीच्या अंगावर ढकलून देत अश्लील फोटो काढले. तेथून त्यांना अजित घोलप व विजय गिरीगोसावी यांनी गिरवीरोडला जाणाऱ्या ओढ्यात जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून घेऊन गेले. तेथे राजू बोके, मनोज हिप्परकर, रोहित भंडलकर हेही त्यांच्या मोटारसायकलवरून आले. त्या सर्वांनी फिर्यादी यांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण, दमदाटी केली. रोहित भंडलकर याने फिर्यादी यांच्या तोंडात लघुशंकाही केली. त्यावेळी बाकीच्या लोकांनी त्यांना धरून ठेवले होते. यावेळी त्यांनी आत्ता पोलीस ठाण्यात तुला घेऊन जातो व त्या मुलीला तुझ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार देण्यास सांगतो,’ असे म्हणत वीस लाखांची खंडणी मागितली. संबंधित व्यापाऱ्याने अब्रू जाईल व बदनामी होईल या भीतीने त्यांना १५ लाख ५० हजार रुपये दिले.
या घटनेची माहिती पोलिसांना समजताच व्यापाऱ्याला पोलिसांनी सुरक्षिततेची ग्वाही दिल्याने त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. ए. बनकर करीत आहेत .
चौकट
फलटण तालुक्यात या हनीट्रॅप टोळीने अनेक धनदांडग्या लोकांना लुटण्याचे प्रकार केले आहेत. शहरातील एका प्रसिद्ध सराफाच्या मुलाकडूनही तीस लाख रुपये त्यांनी उकळल्याचे बोलले जात आहे. आपल्या प्रतिष्ठेपायी अनेकांनी तक्रारी न दिल्याने या टोळीने आपले चांगलेच हातपाय पसरले होते. या टोळीकडून अनेक प्रतिष्ठित लोकांची नावे बाहेर येणार आहेत. फसवणूक झालेल्या लोकांनी न घाबरता तक्रारी दाखल करण्याचे आवाहन फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भरत किंद्रे यांनी केले आहे.