रेमडेसिविर प्रकरणात साताऱ्यातील दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:40 AM2021-05-12T04:40:59+5:302021-05-12T04:40:59+5:30
सातारा : विना परवाना आणि मूळपेक्षा अधिक किमतीला रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीसाठी घेऊन जाताना आढळून आलेल्या दोघांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा ...
सातारा : विना परवाना आणि मूळपेक्षा अधिक किमतीला रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीसाठी घेऊन जाताना आढळून आलेल्या दोघांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. संबंधित दोघे शहरातील असून, त्यांच्याकडून दोन इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस दलातील जिल्हा विशेष शाखेस मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले व एक पथक सातारा शहरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी शहरातील समर्थ मंदिर परिसरात मिळालेल्या माहितीच्या आधारे चौकशी करण्यास सुरुवात केली. तेव्हा प्रशांत दिनकर सावंत (वय २९) आणि सपना प्रशांत सावंत (वय २५, दोघेही रा. मंगळवार पेठ, सातारा) हे दोघे जण विना परवाना व मूळ विक्री किमतीपेक्षा अधिक दराने देण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन जाताना आढळले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अरुण गोडसे यांना बोलवून पुढील कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी रेमडेसिविर इंजेक्शन व दुचाकी असा ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत जिल्हा विशेष शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, हवालदार सागर भोसले, जयवंत खांडके, अश्विनी बनसोडे, तेजल कदम, सुमित मोरे, नीलेश बच्छाव, अनिकेत अहिवळे, राहुल वायदंडे आदी सहभागी झाले होते.
.....................................................