लग्नाच्या यजमानांसह तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:58 AM2021-02-23T04:58:28+5:302021-02-23T04:58:28+5:30
सातारा : विवाह सोहळ्यासाठी पन्नास माणसांना उपस्थित राहण्याची मर्यादा घालून दिलेली असतानाही दोनशे ते अडीचशे लोकांना एकत्रित करुन आपत्कालिन ...
सातारा : विवाह सोहळ्यासाठी पन्नास माणसांना उपस्थित राहण्याची मर्यादा घालून दिलेली असतानाही दोनशे ते अडीचशे लोकांना एकत्रित करुन आपत्कालिन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन्ही यजमान आणि मंगल कार्यालयाच्या मालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहनदास इंदलकर, राजकुमार यादव आणि राजेंद्र साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, कोविड कालावधीत आपत्कालिन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा सातारा शहर पोलिसांनी दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना महामारीच्या अनुषंगाने आपत्कालिन कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. गोडोली येथील धनश्री मंगल कार्यालयात रविवार, २१ रोजी झालेल्या विवाह सोहळ्यासाठी २० माणसांची परवानगी असताना प्रत्यक्षात तेथे २०० ते २५० माणसे उपस्थित असल्याचे सातारा शहर पोलिसांच्या निदर्शनाला आले. त्यामुळे पोलिसांनी यजमान मोहनदास सदाशिव इंदलकर (रा. कळंबे, ता. सातारा), राजकुमार तुकाराम यादव (रा. करंजे पेठ, सातारा) तसेच मंगल कार्यालय मालक राजेंद्र प्रभाकर साळुंखे (रा. गोडोली, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राहुल खाडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन नवघणे, चेतन ठेपणे यांनी केली. याप्रकरणी सचिन नवघणे यांनी गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करत आहेत.