फसवणुकीचा गुन्हा.. घडतोय पुन्हा-पुन्हा ! : दोन वर्षांत ९० जणांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:52 PM2019-05-31T23:52:36+5:302019-05-31T23:57:15+5:30
फसवणुकीचा एक गुन्हा घडल्यानंतर काही तासांत दुसरा गुन्हा घडत असल्याने पोलिसांना तपास करताना अक्षरश: नाकीनऊ येत आहे. आॅनलाईनच्या गुन्ह्यांची सूत्रे विशेषत: परराज्यातून हलविली जात असल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे.
दत्ता यादव ।
सातारा : फसवणुकीचा एक गुन्हा घडल्यानंतर काही तासांत दुसरा गुन्हा घडत असल्याने पोलिसांना तपास करताना अक्षरश: नाकीनऊ येत आहे. आॅनलाईनच्या गुन्ह्यांची सूत्रे विशेषत: परराज्यातून हलविली जात असल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे. गेल्या दोन वर्षांची आकडेवारी पाहता जिल्ह्यात ९० फसवणुकीचे गुन्हे घडले असून, संबंधितांना सुमारे अडीच कोटींना गंडा घातला असल्याचे समोर आले आहे.
मारामारी, चोरी, खून, दरोडा अशा प्रकाच्या गुन्ह्यांचे प्रमाण काही वर्षांपूर्वी सर्वाधिक होते. मात्र, जसा काळ बदलला तसा या गुन्ह्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा समाविष्ट झाला. तो इतका झाला की, बाकीच्या गुन्ह्यांना या गुन्ह्याने मागे टाकले. तंत्रज्ञानाचा जेवढा फायदा होत आहे. त्यापेक्षा तोटाच जास्त होत असल्याचे पोलीस डायरीत नोंद असलेल्या फसवणुकीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सध्याचा जमाना हा आॅनलाईन झाला आहे. याचे सर्वसामान्यांना ज्ञान नसल्यामुळे अशा लोकांची फसवणूक होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कर्ज देणे, लॉटरी लागली असल्याचे भासविणे आणि नोकरीच्या आमिषाने फसवणूक होत आहेच; शिवाय तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे, असे सांगूनही पासवर्ड घेतला जात आहे. अशा प्रकारचे गुन्हे घडत असतानाच बँक अकाऊंट हॅक करण्याचे प्रमाणही वाढले असून, हा गुन्हा अत्यंत किचकट आणि आव्हानात्मक आहे. नागरिकांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढल्याचे यापूर्वी अनेकदा घडले आहे.
जिल्ह्यात महिन्यातून आठ ते दहा गुन्हे अशा प्रकारचे घडत आहेत. त्यामुळे एका गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर दुसरा गुन्हा घडत असल्याने पोलिसांवरील ताण प्रचंड वाढत आहे. गुन्ह्याची व्याप्ती किती आहे, हे ठरवून पोलिसांना तपास करावा लागत आहे. एखाद्याच्या अकाऊंटवरून दहा हजार रुपये गायब झाले अन् आरोपी उत्तरप्रदेशमध्ये असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दहा हजारांसाठी पोलिसांना उत्तरप्रदेशला जाणे परवडेल का? याचाही विचार केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे कायम तपासावरच राहतात.
अनेकदा रक्कम जास्त असल्यामुळे पोलीस तपासासाठी परराज्यातही जातात. मात्र, त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांना तेथील स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळत नाही. त्यातूनही मिळालेच तर आरोपीला पकडल्यानंतर त्याच्याकडून फसवणुकीतील रक्कम वसूल करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. तीन-चार दिवस कोठडी मिळाल्यानंतर आरोपी जामिनावर सुटतो. त्यानंतर तो परत महाराष्ट्रात कधीच फिरकत नाही. त्यामुळे ना पोलिसांना समाधान ना ज्याचे पैसे गेलेत त्याला समाधान.
प्रत्येकाला शंभर फोनचे टार्गेट
लोकांना फोन करून पासवर्ड विचारणारी, बँकेचे खाते हॅक करणारी टोळी ही परराज्यातील असल्याचे अनेकदा पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. फोन करण्यासाठी त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलेल्या मुलांची नेमणूक केली जाते. प्रत्येक मुलाला शंभर फोन करण्याचे टार्गेट असते. त्यापैकी दहा व्यक्ती तरी आपल्या जाळ्यात ओढल्या जाव्यात, असा त्यांचा अलिखित नियम असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अनेकदा मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावे सिमकार्ड खरेदी केली जात असल्यामुळे याचा तपास लावणे मोठे आव्हान असते.
तालुक्यातील गुन्हे
सातारा : १३
कोरेगाव : ८
वाई : ११
कºहाड : १७
फलटण : ७
पाटण : १३
खंडाळा : ९
माण : ७
म’श्वर : ५
दोन वर्षांत ९० जणांना गंडा : आरोपीला शोधून काढणे पोलिसांसमोर आव्हान
प्रत्येकाला शंभर फोनचे टार्गेट
लोकांना फोन करून पासवर्ड विचारणारी, बँकेचे खाते हॅक करणारी टोळी ही परराज्यातील असल्याचे अनेकदा पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. फोन करण्यासाठी त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलेल्या मुलांची नेमणूक केली जाते. प्रत्येक मुलाला शंभर फोन करण्याचे टार्गेट असते. त्यापैकी दहा व्यक्ती तरी आपल्या जाळ्यात ओढल्या जाव्यात, असा त्यांचा अलिखित नियम असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अनेकदा मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावे सिमकार्ड खरेदी केली जात असल्यामुळे याचा तपास लावणे मोठे आव्हान असते.