नगरसेवक वसंत लेवेंवर राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 12:51 PM2017-11-03T12:51:36+5:302017-11-03T12:51:51+5:30
सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या आरोपावरून नगरसेवक व आरोग्य सभापती वसंत लेवे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत नगरसेवक अशोक मोने यांनी फिर्याद दिली आहे.
ऑनलाईन लोकमत /
सातारा : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या आरोपावरून नगरसेवक व आरोग्य सभापती वसंत लेवे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत नगरसेवक अशोक मोने यांनी फिर्याद दिली आहे.
सातारा पालिकेमध्ये गुरुवारी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेमध्ये बोलू दिले जात नसल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीनंतर आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी अशोक मोने यांचा गळा धरून त्यांना ढकलून दिले होते. या प्रकारानंतर पालिकेत एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर सायंकाळी वसंत लेवे यांनी अशोक मोने यांनी दमदाटी व शिवीगाळ केल्याची तक्रार नोंदविली होती. त्यानंतर पोलिसांनी मोनेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
दरम्यान, अशोक मोने यांनी आपल्याला वसंत लेवे यांनी शिवीगाळ करत राष्ट्रगीत सुरू असताना ढकलून दिले. त्यानंतर धमकी देत ते सभागृहाबाहेर निघून गेले, अशी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी वसंत लेवे यांच्यावर राष्ट्रगीताचा अवमान आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.