दुसरीचं संकट 'तिने' झेललं! सातारा पोलिसांनी तपासले १३४ सीसीटीव्ही फुटेज; धक्कादायक प्रकार कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 11:25 AM2022-03-24T11:25:42+5:302022-03-24T11:27:28+5:30
Crime News : सातारा शहरात मध्यवस्तीत शासकीय कार्यालयाच्या आडोशाला झोपलेल्या चिमुरडीला तिथून गाडीवर नेऊन तालुका हद्दीत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.
प्रगती जाधव-पाटील
सातारा - भल्या पहाटे तो हाक मारून तिला जागे करतो... त्याला बघून ती हातानेच लांब हो म्हणून सांगते... तो तरीही तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो तेवढ्यात कुटूंबातील कोणी हालचाल करतो आणि तो तिथून निघून जातो... पोलिसांकडे प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील दोन मिनिटांच्या या फुटेजनंतरच तो नराधम तिथेच अन्यत्र असलेल्या चिमुकलीला घेऊन गेल्याचा पोलिसांचा कयास आहे. अनोळखी दुसऱ्या महिलेवर आलेलं संकट या चिमुरडीने झेलून विकृतीशी लढा दिला.
सातारा शहरात मध्यवस्तीत शासकीय कार्यालयाच्या आडोशाला झोपलेल्या चिमुरडीला तिथून गाडीवर नेऊन तालुका हद्दीत तिच्यावर पाश्वी बलात्कार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. भल्या पहाटे हा नराधम त्या महिलेशी काय बोलत होता? महिला तिथून त्याला लांब जाण्यास का सांगत होती? तो तिच्या परिचयाचा होता की अज्ञात होता? या सर्वच बाजुने पोलिसांची तपास चक्र फिरत आहेत.
दरम्यान, पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलेली ही चिमुकली उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. शस्त्रक्रिया केल्याने तिला आणखी काही दिवस दवाखान्यात रहावे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रस्त्यावर असली म्हणून काय झालं?
राहायला घर नसल्याने रस्त्याचा आसरा घेऊन सहकुटूंब निवारा शोधणाऱ्या कुटूंबातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिला कोणत्याही कारणांनी रात्री उशीरा रस्त्यावर दिसली की तिच्यावर हात टाकण्याची मानसिकता चिरडणे महत्वाचे आहे. चिमुरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातही ती रस्त्याशेजारी झोपली होती म्हणूनच ती बळी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. पण रस्त्यावर असली म्हणून तीच्यावर कोणीही मालकी दाखविण्याची विकृती ठेचणं ही सुज्ञ सातारकरांची जबाबदारी आहे.
पोलिसांनी तपासले १३४ सीसीटीव्ही फुटेज!
शहरातील मध्यवस्तीतून चिमुकलीला गाडीवर नेल्याचा अंदाज बांधून पोलिसांनी या मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्याचे सत्र सुरू केले आहे. मध्यवर्ती ठिकाणापासून मुलगी आढळून आलेल्या ठिकाणापर्यंत दुकाने, घरे, गॅरेज यासह रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेल तपासण्यात आले आहेत. या तपासात नेमके काय निष्पन्न झाले, याची माहिती पोलिसांनी दिली नसली तरीही या मार्गावरील तब्बल १३४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील पहाटेचे फुटेज पोलिसांनी तपासल्याची माहिती सुत्रांनी दिली.
जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी व बाल कल्याण समिती यांच्यातील वादामुळे साताऱ्याची हक्काची समिती आता अस्तित्वात नाही. साताऱ्यात समिती सदस्य बसत नसल्याने अप्रत्यक्षपणे बालकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. प्रशासकीय पातळीवर तातडीने कार्यवाही होऊन ही समिती गठीत झाली पाहिजे. अन्यथा आम्हा महिलांना वेगळा मार्ग अवलंबा लागेल आणि होणाऱ्या परिणाला स्थानिक प्रशासन जबाबदार असेल.
- सुवर्णा पाटील, राज्य उपाध्यक्ष, भाजप महिला मोर्चा