मलकापुरात ‌‌वाढती गुन्हेगारी; भरदिवसा रस्त्यात तळपली शस्त्रे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 04:02 PM2021-12-16T16:02:39+5:302021-12-16T16:11:39+5:30

हल्लेखोरांनी हातात शस्त्रे घेऊन रस्त्यावरच नंगानाच करीत शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

Crime is on the rise in Malkapur satara district | मलकापुरात ‌‌वाढती गुन्हेगारी; भरदिवसा रस्त्यात तळपली शस्त्रे..!

मलकापुरात ‌‌वाढती गुन्हेगारी; भरदिवसा रस्त्यात तळपली शस्त्रे..!

googlenewsNext

माणिक डोंगरे

मलकापूर : शहरात रस्त्यातच भरदिवसा युवकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या हल्ल्यानंतर संबंधित हल्लेखोरांनी हातात शस्त्रे घेऊन रस्त्यावरच नंगानाच करीत शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावण आहे. गुन्हेगारी टोळ्यांऐवजी गुंडगिरीत प्यादी सक्रिय झाल्यामुळे शहरात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मलकापूर शहरात किरकोळ कारणांवरून युवकांच्या दोन गटात राडा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटनांची पोलिसात नोंद होत नाही. परिणामी, सध्या युवकांच्यात कसलीही भीती राहिली नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. किरकोळ कारणावरून वारंवार बाचाबाची व मारामारी होतच असते. गत काही दिवसांमध्ये घडलेल्या गुन्हेगारी घटनांवरून शहरात पुन्हा एकदा गुंडांची दहशत वाढल्याचे दिसत आहे. बुधवारी अहिल्यानगर येथील विश्वास येडगे हा युवक नेहमीप्रमाणे मलकापूर फाटा परिसरात आला होता. त्यावेळी पाचपेक्षा जास्तजण दुचाकींवरून त्या ठिकाणी आले. काही कळण्यापूर्वीच त्यांनी येडगे यास बेल्टसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

स्वत:ला वाचवण्यासाठी येडगे उपमार्गावर पळत असताना त्यामधील काही युवकांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात उपमार्गावरच पडला. मलकापूर फाटा हे गर्दीचे ठिकाण असल्यामुळे हल्लेखोरांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. मात्र, हातात शस्त्रे घेऊन आरडाओरडा करत भररस्त्याने नंगानाच करीत त्यांनी दहशत माजवली. हल्ल्यानंतर जखमी येडगेला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरात दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ माजली असून मलकापुरात सध्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे पहायला मिळत आहे.

भरचौकात झालेल्या हल्ल्याने मलकापूर हादरले

- मलकापूर फाटा हे शहराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या भरचौकात बुधवारी सकाळी हा हल्ला झाला.

- यावेळी परिसरातील काही व्यावसायिकांनी ताबडतोब दुकाने बंद केली.

- या घटनेने मलकापूरमधील नागरिकांनी मोठी धास्ती घेतली आहे. अचानक युवकांच्या टोळक्याने भरचौकात केलेल्या हल्ल्याने मलकापूर हादरले आहे.

वर्चस्ववाद ठरू शकतो टोळीयुद्धाचे कारण

- मलकापुरात गुन्हेगारी रोखण्यासाठी पालिकेने आगाशिवनगर येथे झेडपी कॉलनी, शिवछावा चौक, मलकापूर फाटा, कोल्हापूर नाका, शिवाजी चौक, कन्या शाळा परिसर अशा सहा ठिकाणी सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे चौकाचौकात होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे.

- मात्र शहरात युवकांच्या दोन गटात बाचाबाची व हाणामारी होण्याच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे युवकांचे गट एकत्र येत रेकॉर्डवरील गुन्हेगारी टोळीत तिसरी फळी तयार होत असून हा वर्चस्ववाद टोळीयुद्धाला निमंत्रण देणारा ठरू शकतो. त्यामुळे अशा घटनांवर आवर घालणे गरजेचे आहे.

बाहेरचे भांडण... मलकापुरात राडा

- अनेक व्यवसाय व नोकरीनिमित्ताने शहरात येणाऱ्याची व जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

- अनेकवेळा परगावात झालेल्या भांडणाचे मलकापुरात उट्टे काढण्याच्या घटना वारंवार घडतात. बाहेर कुठेतरी झालेल्या भांडणातील युवकांचा मलकापुरात राडा होत आहे.

Web Title: Crime is on the rise in Malkapur satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.