तलवार, कोयत्याने वार करणाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 04:39 PM2020-06-15T16:39:40+5:302020-06-15T16:41:19+5:30
सातारा : विसावा नाका परिसरात तलवार आणि कोयता घेऊन शुक्रवारी भरदुपारी दहशत माजविणाऱ्या आणि एका युवकावर वार करणाऱ्या सहा जणांवर पोलिसांनी ...
सातारा : विसावा नाका परिसरात तलवार आणि कोयता घेऊन शुक्रवारी भरदुपारी दहशत माजविणाऱ्या आणि एका युवकावर वार करणाऱ्या सहा जणांवर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
अमिर शेख (रा. वनवासवाडी, सातारा), आयुष भिसे, ओंकार भिसे, आकाश पवार, गोट्या जाधव, शुभम बगाडे (सर्व रा. मोळाचा ओढा, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, गुन्हा दाखल झालेले वरील सहाजण शुक्रवारी दुपारी विसावा नाका परिसरातून हातात तलवार, कोयता घेऊन आले.
वाटेत त्यांनी एका कारची आणि दोन दुचाकींचीही तोडफोड केली. त्यानंतर या युवकांनी उमेश आप्पाराव गायकवाड (वय २४, रा. लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी, सदर बझार सातारा) याच्यावर तलवार अन् कोयत्याने वार केले. तसेच त्याच्या खिशातील पैसे आणि गळ्यातील चेनही हिसकावून त्यांनी पलायन केले.
या प्रकारानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. सातारा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांनी तत्काळ जखमी उमेश गायकवाडकडून महिती घेऊन संबंधितांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला.
उमेश गायकवाड आणि वरील संशयितांची वर्षेभरापूर्वी मारामारी झाली होती. दरम्यान, उमेश हा शुक्रवारी दुपारी सदर बझारमधील शिवांजली सोसायटीमध्ये राहात असलेल्या आपल्या भावाकडे आला होता. तो इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ दिसताच संशयितांनी त्याचा पाठलाग करत त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर तेथून ते पसार झाले. पूर्वीच्या वादातूनच उमेशवर संबंधितांनी वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी संशयित आरोपींची धरपकड सुरू केली असून, तिघाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.