रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या बर्थडे बॉयसह दहा जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:22 AM2021-03-30T04:22:32+5:302021-03-30T04:22:32+5:30
सातारा : कोरोना महामारीत आपत्कालीन कायद्याचे उल्लंघन करत सातारा येथील गोडोली परिसरात असणाऱ्या जिजामाता उद्यानासमोर पंधरा ते वीस जणांचा ...
सातारा : कोरोना महामारीत आपत्कालीन कायद्याचे उल्लंघन करत सातारा येथील गोडोली परिसरात असणाऱ्या जिजामाता उद्यानासमोर पंधरा ते वीस जणांचा जमाव करून दुचाकीवर केक कापणाऱ्या दहा जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी सहा दुचाकी जप्त केल्या होत्या, मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या.
याबाबत अधिक माहिती अशी, गोडोली येथील जिजामाता उद्यानासमोर रविवार, २८ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वीस ते पंचवीस वयोगटातील दहा ते पंधरा मुले दुचाकीवर केक ठेवून वाढदिवस साजरा करत होते. या वेळी पोलीस येथे गेले असता सारे दुचाकी सोडून तेथून पळून गेले. या वेळी पोलिसांना एमएच ११ - सीवाय ८३१२, एमएच 0९ - सीक्यू ८0२, एमएच ११ - बीक्यू ७९७, एमएच ११ - बीएक्स ४0६३, एमएच ११ - सीएफ 0४७0, एमएच ११ - बीआर १५७७ या सहा दुचाकी आढळून आल्या. दरम्यान, ही मुले अजय भांडे (रा. गोडोली, सातारा) याचा वाढदिवस साजरा करत असल्याची माहिती पोलिसांना समजली. घटनास्थळावरून पोलिसांनी सर्व दुचाकी ताब्यात घेतल्या असून या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक गणेश ताटे यांनी तक्रार दिल्यानंतर अजय भांडे याच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार जयवंत कारळे हे करत आहेत. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व दुचाकी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.