साताऱ्यात पाच व्यावसायिकांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:44 AM2021-05-25T04:44:30+5:302021-05-25T04:44:30+5:30
सातारा: घरपोच सेवेची परवानगी असतानादेखील दुकाने, हॉटेल, दारू दुकान सुरू ठेवून आदेश उल्लंघन करणाऱ्या पाच व्यावसायिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल ...
सातारा: घरपोच सेवेची परवानगी असतानादेखील दुकाने, हॉटेल, दारू दुकान सुरू ठेवून आदेश उल्लंघन करणाऱ्या पाच व्यावसायिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सातारा शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे व बोरगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने लॉकडाऊन कडक करण्यात आल्याने रस्त्यावर वर्दळ मंदावल्याचे दिसून आले. जे विनाकारण बाहेर पडत होते त्यांच्यावर कारवाई सत्र पोलिसांनी सुरूच ठेवली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घरपोच सेवेसाठी परवानगी असताना देवा ऑइल डेपो हे दुकान सुरू ठेवत आदेश उल्लंघन करणाऱ्या देवदत्त रघुनाथ राजमाने (रा. रविवार पेठ, सातारा) तसेच प्रतापगंज पेठेतील महाडवाले ब्रदर्स ही आस्थापना सुरू ठेवल्याप्रकरणी मनीष शरद महाडवाले (रा. प्रतापगंज पेठ, सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या विरुद्ध कॉन्स्टेबल सचिन नवघणे यांनी तक्रार दिली आहे.
देशमुखनगर येथे देशी दारू दुकान सुरू ठेवणाऱ्या श्रीकांत लालासाहेब देशमुख (रा. नांदगाव, ता. सातारा) याच्यावर बोरगाव पोलिसांनी कारवाई केली. त्याच्यावर आदेश उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला असून त्याच्या विरुद्ध कॉन्स्टेबल अमित पवार यांनी तक्रार दिली आहे.
वाढे येथे राष्ट्रीय महामार्गावर पुलाखाली गाडीवर फिरते हॉटेल सुरू ठेवून आदेश उल्लंघन करणाऱ्या सुनील पांडुरंग जाधव (रा. वाढे, ता. सातारा) तसेच हॉटेल रस्सासमोर विनाकारण गाडी फिरवणाऱ्या विनोद बबन भोसले (वय ३८, रा. वाढे कॅनाॅलजवळ, वाढे, ता. सातारा) यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या विरुद्ध पोलीस नाईक दीपक पोळ यांनी तक्रार दिली आहे. हवालदार तोरडमल अधिक तपास करत आहेत.