Satara: ‘मायणी मेडिकल’च्या कोरोना घोटाळ्यातील पदाधिकाऱ्यांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 12:33 PM2024-08-12T12:33:54+5:302024-08-12T12:34:14+5:30
सातारा : कोरोना काळात मृत लोक जिवंत दाखवून पैसे घेऊन अपहार केल्याच्या आरोपावरून मायणी मेडिकल काॅलेजच्या कोरोना कालावधीत असणाऱ्या ...
सातारा : कोरोना काळात मृत लोक जिवंत दाखवून पैसे घेऊन अपहार केल्याच्या आरोपावरून मायणी मेडिकल काॅलेजच्या कोरोना कालावधीत असणाऱ्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसेच या कामासाठी नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वडूज पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सातारा पोलिसांना सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचे सातारा जिल्हा समन्वयक डाॅ. देविदास बागल यांनी या संस्थेतील सर्व जबाबदार असणाऱ्या व्यक्तींविरुद्ध वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कोरोना काळात मृत रुग्णांना जिवंत दाखवून निधी वाटप केल्याचा आरोप सर्व पदाधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. कोरोना काळात ऑनलाइन माहिती भरण्याचे काम कोरोना काळात मायणी मेडिकल कॉलेजने नेमलेल्या एमसीओ डाॅक्टरचे होते. मात्र, मार्च २०२० पासून नेमलेल्या आरोग्य मित्राने ही माहिती भरत असताना रुग्णांच्या डिस्चार्जबाबतची खात्री केली नाही. रुग्ण मयत झाल्यानंतर त्यांचे दवाखान्यात ॲडमिशन दाखविले, असेही तक्रारीत म्हटले आहे.