बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणाऱ्या सहाजणांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:32 AM2021-01-04T04:32:04+5:302021-01-04T04:32:04+5:30
सातारा : विनापरवाना आणि बेकायदा बैलगाडी शर्यतीचे आयोजन करून बैलांना मारहाण करीत दाताने शेपटी चावणाऱ्या सहाजणांवर वडूज पोलीस ठाण्यात ...
सातारा : विनापरवाना आणि बेकायदा बैलगाडी शर्यतीचे आयोजन करून बैलांना मारहाण करीत दाताने शेपटी चावणाऱ्या सहाजणांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, खटाव तालुक्यातील वाकेश्वर येथे एका ढाब्याच्या पाठीमागे असणाऱ्या मोकळ्या जागेत बेकायदा आणि विनापरवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन धडक कारवाई केली. न्यायालयाचा अवमान करून बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी आयोजक तसेच सहभागींकडून बैलांची शर्यत लावली होती. बैलांच्या पाठीवर चाबकाने मारहाण करून शेपटीचा चावाही घेतला जात होता. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दीपक देवकर यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी बैलगाडी शर्यतीत सहभागी झालेल्या दादासो रामचंद्र जगदाळे (रा. शिरवली, ता. माण), शरद युवराज खरात (रा. आंधळी), अनिकेत संजय वायदंडे (रा. खटाव, मूळ रा. आंधळी, ता. माण), संजय काळे (रा. आंधळी, ता. माण), दिलदार दिलावर झारी (रा. खटाव), विजय तानाजी यादव (रा. कण्हेर खेड, ता. कोरेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस हवालदार एस. ए. ओंबासे हे करीत आहेत.