रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी
By admin | Published: May 1, 2016 12:06 AM2016-05-01T00:06:35+5:302016-05-01T00:15:57+5:30
लूटमार प्रकरण : पोलिस महानिरीक्षकांकडून पथकाला सूचना
कऱ्हाड : नातेवाइकाच्या विवाहासाठी कोल्हापूरला निघालेल्या दाम्पत्याकडील सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज चाकू व तलवारीचा धाक दाखवून लुटण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी रात्री वाठार गावच्या हद्दीत घडला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली असून, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कसून चौकशी केली जात आहे.
दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा शनिवारी दुपारी कऱ्हाडला आले होते. त्यावेळी त्यांनी या गुन्ह्यासंदर्भात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
मोहपाडा-रासायनी (ता. खालापूर) येथील गोपाल राम ठाकूर हे गुरुवारी रात्री पत्नी व मुलांसमवेत कारमधून कोल्हापूरला मेहुण्याच्या विवाहासाठी निघाले होते. कार वाठार गावच्या हद्दीत पोहोचली असताना चालकाने लघुशंकेसाठी कार थांबवली. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या पाचजणांनी गोपाल ठाकूर यांच्यासह त्यांची पत्नी, मुले व पुतणीला चाकू, तलवारीचा धाक दाखवून धमकावले. त्यांनी त्यांच्याकडील २ लाख ७० हजार रोख रकमेसह बावीस तोळ्यांचे दागिने लुटले. त्यानंतर दरोडेखोर दुचाकींवरून पसार झाले. याबाबत गोपाल ठाकूर यांच्या फिर्यादीनुसार कऱ्हाड तालुका पोलिसांत अज्ञातांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे पोलिस पथक कसून तपास करीत आहे. तसेच कऱ्हाडसह इस्लामपूर, सांगली, कोल्हापूर, सातारा येथेही तपास पथक रवाना करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)