सत्तेच्या बळावर १४०० जणांवर गुन्हे : पाटील-वारणा योजनेच्या विरोधात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:13 AM2018-05-26T00:13:12+5:302018-05-26T00:13:12+5:30
दानोळी येथून वारणेचे पाणी देणार नाही म्हटल्यावर सत्तेच्या बळावर १४00 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याच्या पाठीमागे इचलकरंजी व सरकारचे गौडबंगाल आहे. वारणाकाठच्या जनतेवर दबाव आणण्याचे कारस्थान यापुढे केले तर शिरोळ
उदगाव : दानोळी येथून वारणेचे पाणी देणार नाही म्हटल्यावर सत्तेच्या बळावर १४00 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याच्या पाठीमागे इचलकरंजी व सरकारचे गौडबंगाल आहे. वारणाकाठच्या जनतेवर दबाव आणण्याचे कारस्थान यापुढे केले तर शिरोळ तालुका गप्प बसणार नाही आणि नको ते आरोप करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी धरणग्रस्तांच्या वसाहतींना आतापर्यंत का पाणी दिले नाही, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान आमदार उल्हास पाटील यांनी दिले.
वारणा बचाव कृती समितीच्यावतीने सुरू असलेले साखळी उपोषण चिपरी (ता. शिरोळ) येथे शुक्रवारी करण्यात आले. यावेळी आमदार पाटील बोलत होते. यावेळी स्वागत सरपंच धनपाल कनवाडे यांनी केले. प्रास्ताविक ‘आंदोलन अंकुश’चे अमोल राजगिरे यांनी केले. यावेळी वारणा बचाव समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे म्हणाले, वारणाकाठच्या जनतेला गोड बोेलून वारणेचे पाणी इचलकरंजीला नेण्याचा डाव फसला आहे.
त्यामुळे नको ते उद्योग करीत वारणाकाठच्या जनतेला बदनाम करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, कोणत्याही बदनामीला न घाबरता वारणेचे पाणी देणार नाही, असे सांगितले.
जि. प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर म्हणाले, पंचगंगा नदी उशाला असून, ती प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न न करता शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा डाव इचलकरंजीचा आहे. यामुळे शेतकºयांनी व वारणाकाठच्या नागरिकांनी जागृत राहावे, असे सांगितले.
यावेळी उपसरपंच प्रवीण देसाई, बबन यादव, सुरेश भाटिया, भगवान कांबळे, रमेश रजपूत, रावसाहेब शेळके, हिंदुराव जगदाळे, श्रीवर्धन भोसले, सतीश मलमे, गुंडू दळवी, मानाजीराव भोसले, रघुनाथ होगले, प्रसाद धर्माधिकारी, बजरंग खामकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सत्तेच्या जिवावर कारनामे
चिपरी येथे साखळी उपोषणात बोलताना शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, चार लाख लोकसंख्या असलेले इचलकरंजीचे लोकप्रतिनिधी सत्तेच्या जिवावर नको ते कारनामे करीत आहेत. तर वारणाकाठची लोकसंख्याही बारा लाखांहून अधिक आहे. याच्याविरोधात जर कारनामे करण्याचा घाट घातला असला तर अशांना वारणाकाठची जनता लवकरच जागा दाखवेल. त्यामुळे यापुढे विचार करून बोलावे, असा टोला त्यांनी नाव न घेता आमदार हाळवणकर यांना दिला.
चिपरी (ता. शिरोळ) येथे अमृत योजनेच्या विरोधात सुरू असलेल्या साखळी उपोषणात बोलताना आमदार उल्हास पाटील. व्यासपीठावर महादेव धनवडे, सुरेश कांबळे, बजरंग खामकर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.