कोरोनामुळे वाजंत्री, बॅन्ड मालकांवर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:35 AM2021-04-19T04:35:45+5:302021-04-19T04:35:45+5:30

ओगलेवाडी: शुभकार्यात मंगल स्वरांनी वातावरण पवित्र करणारे वाजंत्रीवाले सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. ऐन लग्नसराईत मागीलवर्षी टाळेबंदी झाली ...

Crisis of coronation, starvation crisis on band owners | कोरोनामुळे वाजंत्री, बॅन्ड मालकांवर उपासमारीचे संकट

कोरोनामुळे वाजंत्री, बॅन्ड मालकांवर उपासमारीचे संकट

Next

ओगलेवाडी: शुभकार्यात मंगल स्वरांनी वातावरण पवित्र करणारे वाजंत्रीवाले सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. ऐन लग्नसराईत मागीलवर्षी टाळेबंदी झाली आणि व्यवसाय करता आला नाही. मोठे आर्थिक नुकसान सोसून यावर्षी त्यांनी सराव केला. मात्र कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढले व अनेक कठोर निर्बंध शासनाने घातले. आता व्यवसाय करायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. आर्थिक समस्या उभी राहिली असल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे.

महाराष्ट्रात अनेक लोककला आणि आपले पारंपरिक व्यवसाय करून जीवन जगणारे समाज आहेत. वाजंत्री हा एक त्यापैकीच महत्त्वाचा समाज आहे. या समाजाचे लोक मंगलप्रसंगी वाद्ये वाजवून त्याबदल्यात मिळणाऱ्या उत्पन्नातून आपला चरितार्थ चालवत असतात. काळाबरोबर हा समाजही बदलला आणि नवनवीन वाद्ये आणि गायक-गायिका यांचा मोठा संच तयार करून लग्नसराईत वाद्ये वाजवून आर्थिक कमाई करण्याकडे अनेकांचा कल निर्माण झाला. यातून मिळणारे उत्पन्न आणि अनेकजण या व्यवसायात उतरल्याने निर्माण झालेली स्पर्धा यातून अनेक गावांतून बॅन्डपथके तयार झाली. पंधरा ते ५० पर्यंत वादक आणि इतर लोक, असे पथक तयार झाले. आकर्षक पोषाख व विविध प्रकारची आधुनिक वाद्ये वाजवणारे वादक यामुळे हा व्यवसाय चांगलेच बाळसे धरू लागला होता. लग्नाच्या आणि इतर मंगलप्रसंगी वाद्ये वाजवण्यासाठी मोठमोठ्या सुपाऱ्या यांना मिळू लागल्या. आपलाच बॅन्ड कसा सर्वात चांगला आहे, हे दाखवण्यासाठी बॅन्डचे वाहन खूप चांगल्या प्रकारे सजवण्याची चढाओढ सुरू झाली. चांगला होणारा फायदा आणि कमी वेळात मान-सन्मान मिळवून देणारा व्यवसाय, यामुळे अनेकांनी या व्यवसायात मोठी गुंतवणूक केली. ही गुंतवणूक काही लाखाच्या घरात गेल्याने अनेकांनी या व्यवसायासाठी बँकेचे कर्ज उचलले आणि चांगला ताफा तयार केला.

सर्व व्यवस्थित चालू आहे, असे वाटत असतानाच अचानक मागील मार्चमध्ये कोरोनाने सर्वांना कवेत घेतले. परिस्थिती हाताबाहेर चालल्याने केंद्र सरकारने टाळेबंदीचा निर्णय घेतला आणि सर्वच व्यवसाय अडचणीत आले. यामध्ये सर्वात जास्त फटका वाजंत्री व्यवसायाला बसला. ऐन लग्नाच्या मोसमात मागीलवर्षी टाळेबंदीचा निर्णय घेतला गेला. हजारो रुपयांचा तोटा या व्यावसायिकांना सहन करावा लागला. आगाऊ घेतलेली इसारत रक्कमही अनेकांना माघारी करावी लागली. सात ते आठ महिने घरी बसून दिवस काढावे लागले.

दीपावलीनंतर कोरोनाचा प्रभाव कमी होत गेला आणि सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. जानेवारी, फेब्रुवारीत तर कोरोना संपला, असे वातावरण तयार झाले. लग्नाच्या ऑर्डर्सही येऊ लागल्या. इसारत रक्कम देऊन लोक आपल्या मंगल कार्यासाठी ताफे ठरवू लागले. यावर्षी तरी लग्नसराईत चांगला व्यवसाय होईल आणि चार पैसे पदरात पडतील, असे आशादायी चित्र निर्माण झाले असतानाच, पुन्हा कोरोना संसर्ग वेगाने वाढू लागला.

चाैकट :

शासनाने दखल घेण्याची गरज..

लग्नाला पुन्हा ५० लोकांची मर्यादा आली आणि वाजंत्री व्यावसायिकांवर पुन्हा गदा आली. यावर्षीही व्यवसाय होणार नाही, याची जाणीव झाली. आता पुढे काय करायचे, असा प्रश्न आ वासून उभा आहे. लोकांनी दिलेली इसारत रक्कम पुन्हा माघारी मागायला सुरुवात केली आणि परिस्थिती आणखीनच भयावह बनू लागली. यामुळे आता हा ताफा सांभाळणे कठीण होते आहे. व्यवसाय होत नसल्याने उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. या व्यावसायिक लोकांना सरकारकडून कधीही कोणतेही सहकार्य मिळत नाही. मात्र आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याने शासनाने या लोकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी बॅन्ड व्यावसायिक संजय जाधव यांनी केली आहे.

Web Title: Crisis of coronation, starvation crisis on band owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.