The crisis of double taxation escapes; Product concern!
दुबारचे संकट टळले; उत्पादनाची चिंता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 05:33 PM2017-08-01T17:33:54+5:302017-08-01T17:33:54+5:30
Next
ठळक मुद्देवाई तालुक्यातील स्थिती
वाई : जून महिना कोरडा गेला असतानाही जुलै महिन्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने वाई तालुक्यात दुबार पेरणीचे संकट टळले. असे असलेतरीही पावसाची दमदार सुरुवात होऊनही तालुक्यातील सर्वच धरणे भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या धोम धरणात फक्त ६० टक्के, नागेवाडी धरणात ४३ तर बलकवडी धरणात फक्त ८० टक्के पाणीसाठा आहे. बलकवडी व धोम धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर नागेवाडी धरणात पाण्याची आवक मंदावली आहे. पावसाने या आठवड्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने पाण्याची आवक पुरेशी राहणार नाही. त्यामुळे तिन्ही धरणात पुरेसा पाणीसाठा न झाल्यास तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्यावर्षी पावसाने सुरुवात उशिरा करूनही नऊ जुलैला कृष्णा नदीला महापूर आला होता. यावर्षी आॅगष्ट महिना उजाडला तरीही तालुक्यातील धरणांची अवस्था चिंतनीय आहे. पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा पुन्हा एकदा खरीप हंगाम वाया जातोय की काय या चिंतेने ग्रासला आहे. वाई तालुक्याची भौगोलिक परिस्थिती अतिशय विचित्र आहे. हा तालुका सुजलाम-सुफलाम आहे, असे मानले जात असले तरीही वाई तालुक्याचा पश्चिम भाग अतिवृष्टीचा भाग मानला जातो. वाई शहरासह दक्षिण-उत्तरेला पावसाचे प्रमाण मध्यम असते. तर पूर्वेला पाऊस अतिशय कमी पाऊस पडत असल्याने दुष्काळी परिस्थिती नेहमीच उद्भवलेली असते. अशा या विचित्र पर्जन्यमान असणाºया तालुक्यात यावर्षी पश्चिम भागातही पुरेसा पाऊस न पडल्याने संपूर्ण तालुक्यावर दुष्काळाची दाट छाया निर्माण झाली आहे. त्यामुळे वाई तालुका निसर्गाच्या विचित्र अशा परिस्थितीत अडकल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
उत्पादनात घट होण्याची भीती...
आॅगष्ट महिन्यात पुरेसा पाऊस न पडल्यास यावर्षी उत्पादनात घट होण्याची भीती आहे. खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामातील पिकांसाठी धोक्याची घंटा आहे. सध्या सण-उत्सवांना सुरुवात झाल्याने शेतकºयांना ते कसे साजरे करायचे या संकटाने ग्रासले आहे. एकंदरीत बळीराजा काही केल्या निसर्गाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडेल, असे सध्या तरी दिसत नाही.
Web Title: The crisis of double taxation escapes; Product concern!