स्टेरॉईडच्या बेलगाम वापराने म्युकरमायेकोसिसचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:41 AM2021-05-27T04:41:47+5:302021-05-27T04:41:47+5:30

प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविडच्या आजारात आत्तापर्यंत कधीही पराभूत न झालेले औषध म्हणून स्टिरॉईडकडे पाहिले जाते. ...

Crisis of myocardial infarction due to uncontrolled use of steroids! | स्टेरॉईडच्या बेलगाम वापराने म्युकरमायेकोसिसचे संकट!

स्टेरॉईडच्या बेलगाम वापराने म्युकरमायेकोसिसचे संकट!

Next

प्रगती जाधव-पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविडच्या आजारात आत्तापर्यंत कधीही पराभूत न झालेले औषध म्हणून स्टिरॉईडकडे पाहिले जाते. मात्र, त्याचा अनियंत्रित, चुकीच्या मात्रेमध्ये आणि अनिर्बंध काळासाठी वापर झाल्याने म्युकरमायकोसिसचा धोका वाढू लागल्याचे वैद्यकीयतज्ज्ञांचे निरीक्षण आहे. याबरोबरच रेमडेसिविर, टोसिझूमॅब आणि फॅविपीरावीरसारखी प्रायोगिक औषधेही यास कारणीभूत असू शकतात, असे समजण्यास वाव असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

स्टेरॉईडचा वापर कधी करावा, याचे नियम ठरलेले आहेत. कोविड १९ आजारात विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर व्यक्तिची प्रतिकारशक्ती ज्या पध्दतीने विषाणूशी वागते, त्यानुसार रुग्णाला किती प्रमाणात स्टेरॉईड द्यावं हे ठरतं. सुरुवातीला फुफ्फुसाला व नंतर सर्व अवयवांमध्ये कार्यक्षमेतेचे दुष्परिणाम जाणवू लागतात. मात्र, आजारात रुग्णांची लक्षणे वाढण्याबरोबरच स्टेरॉईडचा वापर पाच ते सात दिवसांसाठी केल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० ते ८० टक्के वाढते. स्टेरॉईडच्या वापराने रक्तातील साखरेवर झालेला परिणाम म्हणून ती वाढलेली दिसते, असं मधुमेहतज्ज्ञ सांगतात. त्यांचा सल्ला घेऊन तीन वेळेला तपासणी करून ते प्रमाण २००च्या खाली ठेवल्यास म्युकरचा त्रास होत नाही. उलट कोविडच्या आजारातून रूग्ण बरे होतील, याची खात्री तज्ज्ञांना आहे.

मधुमेह, कॅन्सर असणाऱ्या ज्या रुग्णांनी कोविडवर मात केली आहे, त्या रुग्णांना पुढे काही महिने धूळ आणि दमट वातावरणात न ठेवण्याचा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत. भरपूर प्रकाश असणारी आणि स्वच्छ खोली हे त्यांचे राहण्याचं ठिकाण असावं, असंही ते सांगतात. म्युकरमायकोसिस हा बरा होणारा आजार आहे, फक्त वेळेवर निदान आणि उपचार ही त्याची महत्त्वाची सूची आहेत इतकंच.

चौकट :

१. म्युकरचा फंगस वातावरणातच

म्युकरमायकोसिसमधील फंगस हा खरंतर वातावरणातील ‘युबिकोट्स’ म्हणजे सर्व ठिकाणी, सर्व वेळेवर उपस्थित असलेला फंगस आहे. रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे या फंगसचे आजारात रूपांतर होते. अशा प्रकारच्या केसेस यापूर्वी कर्करोग, एचआयव्ही, अवयव प्रत्यारोपण रुग्ण, अ‍ॅनिमियाचे रुग्णात पाहायला मिळायच्या. त्यामुळे स्टेरॉईडच्या वापराने म्युकरमायकोसिस वाढले, असे म्हणणे अर्धसत्यासारखं आहे.

२. चुकीची उपचार पध्दतीही कारणीभूत

कोविड विषाणूच्या उपचारांमध्ये श्वास घ्यायला त्रास होणाऱ्या अनेक रुग्णांना बाह्यरूपाने ऑक्सिजन पुरविला जातो. रुग्णांना लावलेले हे ऑक्सिजन मास्क निर्जंतूक करून घेणे, हा वैद्यकीय प्रोटोकॉलचा भाग आहे. पण अनेकदा कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे, तर कधी अचानक दाखल झालेल्या रुग्णांना तातडीने सेवा देण्याच्या गडबडीमुळे हे मास्क निर्जंतूक केले जात नाहीत. अस्वच्छतेमुळेही हा फंगस वाढण्यासाठी वातावरण तयार होते.

कोट :

कोविडच्या आजारात स्टेरॉईडने होणारे नुकसान टाळण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिसचे खापर स्टेरॉईडवर फोडणं चुकीचं आहे. कोणत्याही गोष्टीचा अति वापर धोकादायक असतो. तसाच तो स्टेरॉईडच्या बाबतीतही आहे. बेलगाम आणि अनिर्बंध काळासाठी वापरलेले स्टेरॉईड प्राणघातक ठरतात, याविषयी दुमत नाही. पण म्युकर वैद्यकीय दुर्लक्षाचे द्योतक असू शकतं.

- डॉ. प्रतापराव गोळे, मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा

Web Title: Crisis of myocardial infarction due to uncontrolled use of steroids!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.