संकट गंभीर, पण माणुसकी खंबीर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:38 AM2021-04-25T04:38:25+5:302021-04-25T04:38:25+5:30
‘अतिथी देवो भव:’ असं म्हटलं जातं; पण सध्या गरजुंना देव मानलं जातंय. अन्नदाते त्यांचं स्वागत करतायत आणि पोटभर जेवणही ...
‘अतिथी देवो भव:’ असं म्हटलं जातं; पण सध्या गरजुंना देव मानलं जातंय. अन्नदाते त्यांचं स्वागत करतायत आणि पोटभर जेवणही देतायत. अहो, माणसातली माणुसकी संपलीय कुठं..? रस्त्यावर पाहा... माणुसकीचा झरा आजही अखंड वाहतोय. कोरोनाचं संकट गंभीर आहेच; पण त्यातही जिल्ह्यात माणुसकी अद्यापही खंबीर असल्याचंच दिसतंय. जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्था तसेच अन्नदाते भुकेल्यांची भूक भागविण्याचं कार्य अहोरात्र करताना दिसून येतायत. गतवर्षी कोरोनाचं संकट ओढवलं. त्यावेळी त्याचं म्हणावं तेवढं गांभीर्य नव्हतं. आज-उद्या हे थांबेल, अशी अपेक्षा होती; मात्र दिवसेंदिवस हे संकट अधिक गडद होत गेलं आणि हातावर पोट असणाऱ्यांसह अनेक निराधारांना भुकेनं व्याकुळ केलं. आर्थिक घडी विस्कटली. खायचं काय, हा प्रश्न पडला आणि त्याचवेळी शेकडो अन्नदाते समोर आले. गरजुंना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याबरोबरच अन्न पोहोचविण्याचं कामही या अन्नदात्यांनी केलं. आजही त्यांचं हे कार्य अविरत सुरू आहे. वैयक्तिक अन्नदात्यांसह काही सामाजिक संस्थाही अन्नाची पाकिटे पुरवतायत आणि त्यामुळेच जिल्ह्यात कोणी उपाशीपोटी झोपत नाही, हे सुखावह.
- संजय पाटील
फोटो : २४केआरडी०२
कॅप्शन : संग्रहीत