तीन दिवसांत बारा रुग्ण : म्हासोलीवर महाभयंकर कोरोनाचे संकट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 08:27 PM2020-05-20T20:27:18+5:302020-05-20T20:28:10+5:30
रुग्णसंख्या वाढू लागल्याने संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्यात आले आहे. सामाजिक अंतर ठेवणे याबरोबर इतर सूचनाही ग्रामस्थांना ग्रामपंचायत प्रशासन देत आहे. वनवासमाचीचा अनुभव पाहता रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी काळजी घेण्याची गरज ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत. उंडाळे पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील यांनी येथे चोख बंदोबस्त ठेवला आहे.
प्रमोद सुकरे।
क-हाड : क-हाड तालुक्यातील म्हासोली येथे पुण्यावरून आलेल्या एकाला कोरोना झाल्याचे तीन दिवसांपूर्वी स्पष्ट झाले. मात्र, त्यानंतर तीन दिवसांत रुग्णसंख्या १२ वर पोहोचल्याने ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहेत. रुग्णांच्या नजीकच्या सहवासातील अंदाजे १०० जण विलगीकरण कक्षात असल्याने गावावरील कोरोनाचे संकट कायम दिसत आहे.
पुणे-बेंगलोर महामार्गाच्या पश्चिमेला तालुक्यातील अनेक गावे डोंगरकपारीत वसली आहेत. त्यापैकीच म्हासोली हे एक गाव आहे. सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील बहुसंख्य लोक रोजगारासाठी पुणे-मुंबईला दिसतात. लॉकडाऊनमुळे शहरातील लोंढे गावाकडे पोहोचले आहेत. त्याला म्हासोलीसुद्धा अपवाद नाही.
म्हासोलीचा असाच एक तरुण कामासाठी पुण्यात होता. तो गावी परतला अन् तब्बल ४० दिवसांनी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तोवर त्याच्या कुटुंबातील लोकांना याचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्याचा भाऊ, वहिनी, आई, चुलता, चुलती, मावसभाऊ हे सगळे बुधवारी कोरोना रुग्ण बनले आहेत. शिवाय संपर्कातील इतर काहींनाही याची लागण झाली आहे.
रुग्णसंख्या वाढू लागल्याने संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्यात आले आहे. सामाजिक अंतर ठेवणे याबरोबर इतर सूचनाही ग्रामस्थांना ग्रामपंचायत प्रशासन देत आहे. वनवासमाचीचा अनुभव पाहता रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी काळजी घेण्याची गरज ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत. उंडाळे पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील यांनी येथे चोख बंदोबस्त ठेवला आहे.
जिल्हाधिकारी यांनी दिली भेट
म्हासोली गावात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने बुधवारी या गावाकडे धाव घेतली. जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्वी सातपुते दुपारी बारा वाजता गावात पोहोचले. कोरोनावर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती त्यांनी सरपंच कमल देवकुळे, पोलीस पाटील हारुण मुल्ला यांच्याकडून घेतली.
त्यांच्या अहवालाकडे लागलेय लक्ष !
म्हासोली गावातील सुमारे १०० वर लोक विलगीकरण कक्षात आहेत. त्यांच्या स्त्रावाचे नमुने घेण्यात आले असून, त्याचे रिपोर्ट काय येतात? त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तोपर्यंत ग्रामस्थांना धाकधूक लागून राहिलेली दिसते.
पोलिसांनी दिला ग्रामस्थांना ‘प्रसाद’
म्हासोलीत तीन दिवसांत १२ रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने जिल्हा प्रशासन चांगलेच हडबडले आहे. मात्र तरीही इथल्या ग्रामस्थांना त्याचे तितकेसे गांभीर्य दिसत नाही. शब्दाची भाषा न समजणाऱ्या ग्रामस्थांना पोलिसांनी बुधवारी काठीने प्रसाद दिला. तरुण वर्ग, शेतकरी यांच्याबरोबर झºयावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांनाही याचा प्रसाद मिळाल्याची चर्चा आहे.
म्हासोली गावावर आलेले कोरोनाचे संकट खूप मोठे आहे. यावर मात करण्यासाठी ग्रामस्थांची साथ महत्त्वाची आहे. ग्रामस्थांनी प्रशासनास योग्य सहकार्य केल्यास या संकटावर मात करणे सोपे होणार आहे. प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे औषध फवारणी, रस्ते बंद करणे, प्रबोधन या बाबी सुरूच आहेत.
- हारुण मुल्ला,
पोलीस पाटील, म्हासोली.
म्हासोली, ता. क-हाड येथे पुण्याहून आलेल्या एकाला कोरोना झाल्याने पोलीस प्रशासनाने गावच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेटस् लावून गाव सील केले आहे.