संघातील मनोमिलन ठरले निर्णायक!
By admin | Published: June 22, 2015 10:17 PM2015-06-22T22:17:59+5:302015-06-22T22:17:59+5:30
शिक्षक बँक : संघात एकजूट झाली तरी ती टिकविण्याचे मोठे दिव्य
सागर गुजर - सातारा -प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धूळ चारण्याच्या हेतूने पूर्वीचे विरोधक एकत्र आले. मागच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढल्याने दोन शिक्षक संघांना बँकेतील सत्तेपासून बाजूला जावे लागले होते. आता या दोन संघांनी एकत्र येऊन सत्ताधारी शिक्षक समितीला बाहेरचा रस्ता दाखविला आहे. ही एकजूट कायम टिकविण्याचे मोठे दिव्य दोन्ही संघांच्या प्रमुखांना तसेच कार्यकर्त्यांना आता पार पाडावे लागणार आहे.
बँकेच्या मागील निवडणुकीत माजी आमदार शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक संघ विरोधात लढले होते. या दोन्ही संघांतील मतभेदाचा फायदा विठ्ठल माने यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक समितीला झाल्याने समिती सत्तेवर आली होती.
या निवडणुकीतही आमदार शिवाजीराव पाटील गट शिक्षक समितीकडे झुकणार, असे बोलले जात असतानाच अर्ज मागे घेण्यादिवशीच पाटील व थोरात गटाचे मनोमिलन झाले. आमदार पाटील गटाचा पाठिंबा अपेक्षेप्रमाणे निर्णायक ठरला.
नऊ जागांपैकी परळी, दहिवडी, तरडगाव, खटाव हे चार सर्वसाधारण मतदारसंघ माजी आमदार शिवाजीराव पाटील गटाने जिंकले. राखीवमधील अनुसूचित जाती जमाती व महिला राखीव एक अशा सहा जागा जिंकल्या आहेत. तर संभाजीराव थोरात गटाने वाट्याला आलेल्या १२ जागांपैकी जावळी, महाबळेश्वर, खंडाळा, आरळे, फलटण, म्हसवड, रहिमतपूर, नागठाणे हे सर्वसाधारण व महिला राखीव, इतर मागास, भटक्या विमुक्त अशा ११ मतदारसंघांवर विजय मिळविला आहे. हे बलाबल पाहता थोरात गटाचे वर्चस्व पाहायला मिळत असून, बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत दोन्ही संघांना वाद टाळून तडजोडी कराव्या लागणार आहेत.संघाचा बोलकिल्ला असलेले जावळी, महाबळेश्वर, खंडाळा, फलटण-बरड हे मतदारसंघ कायम राखून विजय मिळवून बालेकिल्ला अभेद्य ठेवला.
परळी, तरडगाव, नागठाणे मतदारसंघ लक्षवेधी
परळी मतदारसंघ हा समितीचा बालेकिल्ला मानला जातो. शंकर देवरे यांच्या या हुकमी मतदारसंघातच संघाच्या राजकुमार जाधव यांनी समितीला धूळ चारली. तरडगावमध्येही तुकाराम कदम यांनी सत्तांतर करून दाखविले. मागील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत ठरलेले संघाचे राजेंद्र घोरपडे या निवडणुकीत विजयी ठरले.
आम्हाला चार जागा मिळाल्या त्यात आणखी चार जागांची भर पडली असती तर चित्र वेगळे दिसले असते. परळीतील बंडखोरी, रहिमतपूर, दहिवडीमधील समितीअंतर्गातील धुसफूस आमच्यासाठी धोकादायक ठरली आहे. याचे चिंतन करण्याची ही वेळ आहे.
- विठ्ठल माने, बँकेचे माजी अध्यक्ष
जिल्ह्यातील शिक्षक सभासदांनी बँकेत सत्तांतर घडवून जो विजय मिळवून दिला आहे, तो संघाच्या दृष्टीने ऐतिहासिक विजय आहे. सभासदांचे हीत डोळ्यांसमोर ठेवून बँकेमध्ये चांगले काम करून दाखवू.
- सिद्धेश्वर पुस्तके,
जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ (थोरात गट)
शिक्षक बँकेतील विजय हा संघ शक्तीचा विजय असून, आम्ही सहकार्याची भूमिका घेतल्याने व एकत्र प्रयत्न केल्यामुळे संघाची सत्ता आली आहे. एकोप्याशिवाय बँक चालणार नाही, त्यामुळे संघातील मनोमिलन अबाधित ठेवून काम करणार आहे.
- माजी आमदार शिवाजीराव पाटील,
अध्यक्ष शिक्षक संघ
माजी आमदार शिवाजीराव पाटीलप्रणित संघ हा सत्तेच्या समीकरणात महत्त्वपूर्ण होता, त्यामुळे मनोमिलन घडून आले. मनोमिलनाची एकत्रित ताकद काय असते, ते आम्ही दाखवून दिले आहे.
- तुकाराम कदम,
राज्य कोषाध्यक्ष, (शिक्षक संघ, पाटील गट)