गंभीर रुग्णही गृहविलगीकरणात; जिल्ह्यात तीन महिन्यांत घरातच ९ मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:42 AM2021-04-23T04:42:15+5:302021-04-23T04:42:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात गत तीन महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्व रुग्णालये हाउसफुल्ल ...

Critical patients also in home segregation; 9 deaths in three months in the district! | गंभीर रुग्णही गृहविलगीकरणात; जिल्ह्यात तीन महिन्यांत घरातच ९ मृत्यू !

गंभीर रुग्णही गृहविलगीकरणात; जिल्ह्यात तीन महिन्यांत घरातच ९ मृत्यू !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात गत तीन महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्व रुग्णालये हाउसफुल्ल झाली असून तेथेही बेड शिल्लक नाही. त्यामुळे नाइलाजास्तव अनेक बाधितांना घरातच उपचार करावे लागत आहेत. मात्र प्रकृती बिघडल्यानंतर उपचार न मिळाल्यामुळे घरातच ९ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या आणखी जास्त असू शकते, मात्र प्रशासनाकडे याची आकडेवारी नसल्याचे समोर येत आहे.

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर अशी आहे. पाहता पाहता सर्व हॉस्पिटल हाउसफुल्ल झाली. बेड, ऑक्सिजन रुग्णांना मिळत नाहीत. त्यामुळे अनेक बाधित रुग्णांनी घरामध्येच उपचार करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोना चाचणी करताना संबंधितांकडून पत्ता आणि मोबाइल नंबर रुग्णालय प्रशासनाकडून घेतला जातो. त्या वेळी अनेक जण चुकीचा मोबाइल नंबर आणि पत्ता देत असल्यामुळे पुढे बाधित रुग्णांचे काय झाले, हे प्रशासनाला समजत नाही. अशा अनेक जणांचा घरांमध्ये उपचार घेत असताना गंभीर अवस्थेत त्यांचा मृत्यू झाल्याचेही पुढे येत आहे. परंतु प्रशासनाकडे हीच आकडेवारी नाही. घरात उपचार करूनही अनेक रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. मात्र घरामध्ये वयस्कर लोकांनी उपचार घेणे धोक्याचे असते. परंतु असे असतानाही अनेक जण हा धोका पत्करत आहेत. त्याचे कारण म्हणजे रुग्णालयात बेड मिळत नाहीत.

गत तीन महिन्‍यांत जिल्ह्यामध्ये ९ जणांचा घरातच मृत्यू झाला आहे. अचानक प्रकृती बिघडल्यानंतर या बाधित रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे घरात उपचार करून कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाणही वाढत आहे. हे प्रशासनासाठी मोठा दिलासा ठरत आहे. गृह विलगीकरणामध्ये असलेल्या लोकांशी प्रशासन आपल्या परीने संपर्क साधतेय. मात्र चुकीचे मोबाइल नंबर दिल्यामुळे प्रशासनाला लोकांशी संपर्क साधता येत नाही. त्यामुळे मृतांची आकडेवारी याहून जास्त असू शकते.

चौकट : होम क्वारंटाइनमध्ये सर्वाधिक रुग्ण

जिल्ह्यात सध्या १६ हजार कोरोनाबाधित रुग्णसंख्या आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करणे शक्य नाही. त्यामुळे यातील अनेक जण होम आयसोलेशनमध्ये दाखल असल्याचे प्रशासन सांगत आहे. असा हा आकडा तब्बल आठ हजारांहून अधिक आहे. या रुग्णांशी प्रशासन आपल्या परीने संपर्क साधत आहे. परंतु चुकीचे नंबर असल्यामुळे त्यांचे काहीही संपर्क होत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. ज्यांना शक्य आहे त्यांना घरी जाऊन औषधोपचार केले जात आहेत.

चौकटः एक टक्का मृत्यू घरातच

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणारे रुग्ण अचानक प्रकृती बिघडल्यानंतर दगावत आहेत. असे प्रमाण जिल्ह्यात सध्या १ टक्का असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. होम आयसोलेशनमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या यापुढे आणखी वाढेल, असा विश्वासही प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

चौकट ः कारणे काय?

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असणारे रुग्ण बरेचदा औषधे वेळेवर घेत नाहीत. स्वतःकडे दुर्लक्ष केल्यानंतर अचानक परिस्थिती उद्भवल्यानंतर अशा लोकांची प्रकृती गंभीर बनत आहे. आजार अंगावर काढणे, हे एक प्रमुख कारण असल्यामुळे गृह विलगीकरणातील लोक दगावत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

कोट ः

होम आयसोलेशनमध्ये अनेक जण उपचार घेतात. या रुग्णांनी घराच्या बाहेर पडू नये. विश्रांती आणि योग्य आहार, औषधे वेळेवर घेतल्यास नक्कीच रुग्ण घरामध्येच बरे होऊ शकतात.

- डॉक्टर सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

चौकट : एकूण रुग्ण ८७९५८

बरे झालेले रुग्ण ७०६००

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण १६७७६

गृह विलगीकरणातील रुग्ण ८९३०

Web Title: Critical patients also in home segregation; 9 deaths in three months in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.