सत्ताधाऱ्यांवर टीका; कार्यकर्त्यांना कानपिचक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 11:17 PM2018-04-08T23:17:54+5:302018-04-08T23:17:54+5:30
कोरेगाव : ‘राज्य सरकारकडून जलसंधारणाच्या कामांचा ढोल वाजवला जात असून, एकाही योजनेला निधी जात नाही. या खात्याचे मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असूनदेखील ते काही करत नाहीत, याचे विशेष वाटते. सरकारने हुकूमशाही आणली असून, लोकशाहीचा गळा घोटला आहे,’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
कोरेगाव येथील बाजार मैदानावर रविवारी राष्टÑवादीच्या हल्लाबोल आंदोलनाची सभा झाली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्टÑवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्रामसिंह कोते-पाटील, राष्टÑवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे उपस्थित होते.
चित्रा वाघ, प्रमोद हिंंदुराव व महेश तपासे यांची भाषणे झाली. तालुकाध्यक्ष भास्कर कदम यांनी स्वागत केले.
हे तर पक्षाचे आंदोलन
अजित पवार यांनी कोरेगाव तालुक्यातील पक्षांतर्गत गटबाजीला भाषणात लक्ष्य केले. कार्यकर्त्यांना उपदेशाचा डोस पाजत पक्षात एकोप्याने राहण्यास सांगितले. ‘हल्लाबोल आंदोलन हे पक्षाचे आंदोलन असून, कोणाच्या घरचे लग्न नाही,’ असे त्यांनी सुनावले.
वडाचीवाडी ते कोरेगाव भव्य रॅली
वडाचीवाडी येथून राष्टÑवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवकांची दुचाकी रॅली काढली. बाजार मैदानावर तोबा गर्दी झाली होती.
मॉनिटरचे
कोण ऐकतो ?
आमदार शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना टार्गेट करत जोरदार तोंडसुख घेतले. ‘मी हुशार वर्गाचा मॉनिटर आहे,’ या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना, आमदार शिंदे यांनी ‘मॉनिटरचे कोण ऐकतो?’ अशी टीका करताच जोरदार हशा पिकला.