विरोधकांच्या टीकेला आता जशास तसे उत्तर दिले जाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:43 AM2021-09-27T04:43:23+5:302021-09-27T04:43:23+5:30
खटाव : ‘जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेखाली मंजूर झालेल्या कामांचे श्रेय आमदार निधीतून मंजूर झाले असे सांगून लोकांची दिशाभूल करण्याचे ...
खटाव : ‘जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेखाली मंजूर झालेल्या कामांचे श्रेय आमदार निधीतून मंजूर झाले असे सांगून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सध्या विरोधकांचे सुरू आहे. विरोधकांना जशास तसे उत्तर दिले जाईल,’ असा इशारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी दिला.
खटाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आधुनिक सुविधा असलेली रुग्णवाहिका दाखल झाली आहे. तिचे लोकार्पण खटाव ग्रामपंचायतीसमोर करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी विधाते म्हणाले, ‘श्रेयवादाचे नवीनच तंत्र सुरू झाली आहे. न केलेल्या कामाचेदेखील श्रेय घेण्यासाठी विरोधकांची घाई होत आहे. यशवंतरावांचे नाव घ्यायचे आणि खालच्या पातळीवर टीका करायची. दोन वर्षांपूर्वी खटाव ग्रामपंचायतीत विश्वासाने सत्ता बहाल केली. त्या विश्वासाला तडा देण्याचे काम सध्याच्या सर्वच सदस्यांकडून होते. खटावमध्ये सुडाचे व हुकूमशाहीचे राजकारण सुरू आहे. कोरोनाकाळात अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत होते. केवळ प्रसिद्धीसाठी काम न करता रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळावेत, याकरिता मी व माझी संघटना धडपडत होतो. रुग्णांना बघताना आम्ही पाठीमागे कॅमेरेवाले घेऊन फिरत नव्हतो. खटावला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे खडीकरण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे. खटाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अद्ययावत इमारतीच्या बांधकामासाठी दहा कोटी ५३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे लवकरच भूमिपूजन होणार आहे. पाच लाखांच्या स्मशानभूमीच्या वॉल कंपाउंडसाठी श्रेयवाद होत आहे. विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप केले. याला आता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे.’
यावेळी खटाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी चेतन अहिवळे, माजी सरपंच बबन घाडगे, रसूल मुल्ला, मनोज देशमुख, किशोर डंगारे, मुगुटराव पवार, दिलीप जाधव, चंद्रकांत भराडे, विलास देशमाने, अरुण देशमाने, संपतराव देशमुख, सतीश शिंदे, एकनाथ चव्हाण, किरण राऊत, गणेश शेडगे, अभय भोसले, सुरेश वाघ उपस्थित होते.
कॅप्शन २६खटाव
खटाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या नूतन रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चेतन अहिवले, बबन घाडगे, रसूल मुल्ला उपस्थित होते. (छाया : नम्रता भोसले)