मान्याचीवाडीत रानडुकरांकडून पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:14 AM2021-08-02T04:14:49+5:302021-08-02T04:14:49+5:30
ढेबेवाडी : मान्याचीवाडी परिसरात रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाच्या तडाख्यातून कशीबशी वाचलेली पिके आता ...
ढेबेवाडी : मान्याचीवाडी परिसरात रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाच्या तडाख्यातून कशीबशी वाचलेली पिके आता रानडुकरांनी फस्त केल्याने शेतकरी हतबल झाला आहे. वनविभागाने या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ढेबेवाडी विभागात असलेल्या वाल्मीकच्या जंगलासह बहुतेक गावानजीकचे डोंगर आता बोडके झाले आहेत. घनदाट जंगलावर लाकूड चोरांनी हात मारल्याने घनदाट जंगलातील वनसंपदा नाहीशी झाली आहे. यामुळे जंगलात वास्तव्य करणारे हिंस्र प्राण्यांनी लोकवस्तीकडे धाव घेतली आहे. आतापर्यंत जंगलालगतच्या शेतावर हल्ला करणारे गवे, रानडुकरांसारखे प्राणी आता मानवी वस्तीलगतच्या शिवारातही राजरोस शिरकाव करत आहेत.
मान्याचीवाडी, काजारवाडी, शिद्रुकवाडी गावे आणि वस्त्या डोंगरालगत आहेत. येथे खरीप पिकाबरोबरच ऊसशेतीचेही मोठे क्षेत्र आहे. यावर्षी खरीप पेरणीनंतर पिकांना अपेक्षित वातावरण असल्याने भात, भुईमूग, सोयाबीन, हायब्रीड या पिकांनी जोर धरला होता. मात्र अचानक आलेले मुसळधार पाऊस आणि नदीला आलेला पूर यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र त्यातून बचावलेली पिके कशीबशी वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. त्यातच आता रानडुकरांकडून पिकांची मोठी नासधूस करण्याची मालिकाच सुरू झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. वनविभागाने याची दखल घेऊन पिकांचे नुकसान करणाऱ्या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोट :
रानडुकरांच्या कळपांनी शेतीपिकांचे मोठे नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेला घासही हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात हाताशी लागणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीची मोठी झळ पोहोचली आहे. वनविभागाने यावर पर्याय काढावा.
- विठ्ठल माने,
शेतकरी मान्याचीवाडी.
फोटो ०१ मान्याचीवाडी
मान्याचीवाडी परिसरात रानडुकरांनी ऊस पिकाचे मोठे नुकसान केले आहे. (छाया : रवींद्र माने)