रानडुकरांच्या उपद्रवामुळे पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:47 PM2020-11-23T12:47:00+5:302020-11-23T12:51:01+5:30
Animal Abuse, Satara area, Farmer, wildanimal सोनजाई डोंगरावरील शेतात रानडुकरांनी धुडगूस घालून पाच एकर ज्वारी पिकाची मोठ्या प्रमाणावर नासधूस करून नुकसान केले. यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून, नुकसान झालेल्या पिकांची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
वाई: सोनजाई डोंगरावरील शेतात रानडुकरांनी धुडगूस घालून पाच एकर ज्वारी पिकाची मोठ्या प्रमाणावर नासधूस करून नुकसान केले. यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून, नुकसान झालेल्या पिकांची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
वाई तालुक्यात ग्रामीण भागात सध्या पाण्याचे स्त्रोत कमी झाले असून, अन्नाच्या शोधात भटक्या जनावरांसह रानडुकरे उभ्या पिकात घुसून नासाडी करताना दिसत आहेत. आरगड ज्वारी खाण्यासाठी आलेली रानडुकरे मोठे नुकसान करून जमीनदोस्त करून खात असल्याने पिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सोनजाईच्या पठारावर डोंगर भागात रानडुकरांचे प्रमाण जास्त असल्यामुळे उभ्या असलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रान डुकरांच्या उपद्रवामुळे परिसरातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकरी आपल्या शेतात रानडुकराचा त्रास होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या क्लपत्या लढविताना दिसत आहे. संपूर्ण शेताला साडीने लपटण्यात येते. या आवाज करणारी पत्र्याची डबडी बांधण्यात येतात. थायमेट घालण्यात येते. तरीही शेतकऱ्यांची नजर चुकवून शेती फस्त केली जाते.
संबंधित विभागाने शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. डोंगर माथ्यावर पावसाचे प्रमाण जेमतेम असल्याने उन्हाळ्यात हे सर्व जंगली प्राणी पाण्याच्या शोधात नागरी वस्तीत येऊन उभ्या पिकांचे मोठे नुकसान करतात. परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तक्रार करा.. नुकसान भरपाई मिळेल..
वन्य प्राण्यांकडून उभ्या पिकांचे नुकसान झाल्यास वनविभागकडून नुकसान भरपाई मिळते. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुढे येऊन वनविभागाशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी वनविभागात तक्रार दाखल करण्याची आवश्यता आहे. तसे आवाहन ही वनविभागाकडून करण्यात आले आहे. यापूर्वी अनेकवेळा वनविभागाकडून तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांनी दिली.