पीक विमा कंपन्या मालामाल; ४८ लाख भरले, मिळाले फक्त पाच लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:36 AM2021-05-22T04:36:09+5:302021-05-22T04:36:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना असली तरी म्हणावा असा लाभ त्यांना मिळत नाही. यामध्ये कंपन्याच ...

Crop insurance companies goods; 48 lakhs paid, only five lakhs received | पीक विमा कंपन्या मालामाल; ४८ लाख भरले, मिळाले फक्त पाच लाख

पीक विमा कंपन्या मालामाल; ४८ लाख भरले, मिळाले फक्त पाच लाख

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना असली तरी म्हणावा असा लाभ त्यांना मिळत नाही. यामध्ये कंपन्याच मालामाल होत असल्याचे दिसून आले आहे. सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी खरीप हंगामात ८ हजारांवर शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन ४८ लाख रुपये भरले, तर दोन्ही शासनांनी ७ कोटी रक्कम दिली, पण अजूनही कंपन्यांनी लाभार्थी संख्या निश्चित केलेली नाही. फक्त काही शेतकऱ्यांनाच ५ लाख मिळालेत. त्यामुळे शेकडो शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत.

शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो. यासाठी विमा योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ठरावीक रक्कम भरावी लागते, तर राज्य आणि केंद्र शासनही आपल्या वाट्याची रक्कम विमा कंपनीकडे जमा करते. मात्र, यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ आदी कारणांनी पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुटपुुंजीच मदत मिळत आहे. त्यामुळे यामधून कंपन्यांच मालमाल होत असल्याचे दिसून आले आहे.

सातारा जिल्ह्याचा विचार करता गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील ३८,६७२ शेतकऱ्यांनी विमा घेतला. यामधून भात, बाजरी, ज्वारी, सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग, कांदा, नाचणी आदी पिकांसाठी हे विमा कवच घेतले. ८,१६६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले. त्यासाठी ४८ लाख ७७ हजार ५१२ रुपये शेतकऱ्यांनी भरले, तर राज्य आणि केंद्र शासनानेही रक्कम दिली. गेल्यावर्षी खरीप हंगामात दोन ते तीनवेळा अतिवृष्टी झाली. यामध्ये फळबागा, सोयाबीन, कांदा आदी पिकांचे नुकसान झाले, पण दुसरा खरीप हंगाम आला तरी शेकडो शेतकऱ्यांना विमा कंपनीने आणखी लाभ दिलेला नाही.

गेल्यावर्षी जून आणि जुलै महिन्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले होते. त्या अंतर्गत १६५ शेतकऱ्यांनाच आतापर्यंत ५ लाख ६ हजार ९१२ रुपये विमा रक्कम दिली आहे. त्यामुळे इतर शेतकरी अजूनही लाभाच्या प्रतीक्षेतच असल्याचे दिसून येत आहे.

चौकट :

कहर... लाभार्थी शेतकरी

संख्या अद्याप अनिश्चित...

खरीप हंगामात नुकसान झालेल्या पिकांची विमा रक्कम किमान जानेवारी महिन्यानंतर तरी मिळायला हवी, पण आता मे महिना संपत आला. त्यातच नवीन खरीप हंगाम लवकरच सुरू होत आहे. तरीही नुकसान झालेल्या किती शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळणार हे अजूनही निश्चित झालेले नाही. कोणत्या तालुक्यात, किती गावांत ही मदत मिळणार हे समोर आलेले नाही. त्यामुळे कंपन्या एकप्रकारे आमची चेष्टाच करत असल्याची भावना विमा पीक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांची संख्या निश्चित करून लाभ द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

................................

चौकट :

कंपन्याने नाकारले नाही...

जिल्ह्यात खरीप हंगामात गेल्यावर्षी जून आणि जुलै महिन्यात पीक नुकसान झालेल्या अवघ्या १६५ शेतकऱ्यांना ५ लाख ६ हजारांची भरपाई मिळालेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची नावेच निश्चित झालेली नाहीत. शेतकऱ्यांची भरपाई निश्चित व्हायची आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी अद्यापतरी लाभ नाकारलेला नाही, असे सांगण्यात येत आहे.

चौकट :

खरीप हंगाम २०२०-२१

पीक विमा लागवड क्षेत्र

८१६६ हेक्टर

एकूण जमा रक्कम

७३९०६६९४

.......................

एकूण मंजूर पीक विमा - ०००

प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेले पैसे ४८७७५१२

राज्य शासनाने भरलेले पैसे ३६५५९६६६

केंद्र शासनाने भरलेले पैसे ३२४६९५१५

पीक विमा काढणारे शेतकरी ३८६७२

एकूण लाभार्थी शेतकरी - ०००

कितीजणांना मिळाला विमा १६५

आतापर्यंत वाटप केलेली रक्कम ५०६९१२

..........................................

कोट :

गेल्यावर्षी खरीप हंगामात पीक विमा भरला होता. तसेच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे कृषी विभागाने पंचनामा केला. मात्र, अद्यापही आम्हाला विमा कंपनीकडून लाभ मिळालेला नाही. आता रक्कम मिळाली तर यावर्षीच्या खरीप हंगामासाठी त्याचा उपयोग होईल. यादृष्टीने तातडीने निर्णय होण्याची गरज आहे.

- शांताराम काळे, शेतकरी.

........................................

अतिवृष्टी, दुष्काळात पिके वाया जातात. यासाठी शासनाने पीक विमा योजना आणली. ही योजना फायद्याची ठरत आहे, पण गेल्यावर्षी खरीप हंगामात पिकांचे नुकसान होऊनही लाभ मिळालेला नाही. आम्ही विम्याची रक्कम वेळेत भरतो. त्यामुळे विमा कंपन्याकडून लाभही वेळेत मिळण्याची गरज आहे.

- शामराव पाटील, शेतकरी.

...................................................

गेल्यावर्षी खरीप हंगामात तीनवेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पिकांचा विमा उतरवला होता, पण अजूनही कंपनीकडून विम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे लाभाची रक्कम लवकर मिळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

- रामराव पवार, शेतकरी.

............................................................................................

Web Title: Crop insurance companies goods; 48 lakhs paid, only five lakhs received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.