एक रुपयात पीक विमा; रेकाॅर्ड ब्रेक नोंदणी, ९१ हजार शेतकऱ्यांचा सहभाग
By नितीन काळेल | Published: July 28, 2023 07:41 PM2023-07-28T19:41:56+5:302023-07-28T19:42:30+5:30
३१ जुलै अखेरची मुदत; संख्या आणखी वाढणार
नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : अतिवृष्टी, दुष्काळ तसेच अन्य नैसर्गिक कारणाने पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळवून देणारी पीक विमा योजना आता फक्त रुपया भरुन सुरू आहे. त्यामुळे सहभागी शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून आतापर्यंत ९१ हजार जणांनी सहभाग घेतलाय. तर ३१ जुलै शेवटीची मुदत असल्याने शेतकऱ्यांचा आकडा लाखाच्यावर जाणार हे स्पष्ट झाले आहे.
नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग आदी कारणाने पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाने २०२३ च्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना पुढे सुरु ठेवण्यास मान्यता दिलेली आहे. सातारा जिल्ह्यातही ही योजना लागू आहे. त्यानुसार भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद आणि खरीप कांदा या ९ पिकांसाठी ही योजना लागू आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ३१ जुलै अंतिम मुदत आहे. या योजनेचे प्रमुख वैशिष्ठ म्हणजे शेतकऱ्यांनी फक्त १ रुपया विमा हप्ता रक्कम भरावयाची आहे. तर उर्वरित विमा हप्ता रक्कम शासन भरणार आहे. खरीप हंगाम पीक योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील ९१ हजार ५०० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. योजना सुरु झाल्यापासूनचा हा उच्चांक झाला आहे. तर कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही या योजनेत सहभागी होता येत आहे.
शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरुन खरीप हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी होता येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत या योजनेत सहभाग घ्यावा. तसेच तसेच अधिक माहितीसाठी गाव पातळीवरील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.