कोळेतील थांबा बनला अपघाती क्षेत्र!
By admin | Published: July 17, 2017 02:44 PM2017-07-17T14:44:28+5:302017-07-17T14:44:28+5:30
चालकांची कसरत : एकीकडे चढण तर दुसरीकडे उतार
आॅनलाईन लोकमत
कुसूर (जि. सातारा), दि. १६ : कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील कोळे बस थांब्यावरील चौकात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याठिकाणी असलेल्या चढामुळे अवजड वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. परिणामी या ठिकाणचा थांबा अपघातीक्षेत्र म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनधारकांतून होत आहे.
कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील कोळे येथील बस थांब्याच्या दक्षिणेला नवीन वसाहत तर उत्तरेला कोळे गावात जाण्यासाठी जोडरस्ता असल्यामुळे या ठिकाणी चौक निर्माण झाला आहे. कऱ्हाड-ढेबेवाडी मागार्चे रूंदीकरण करण्यात आले आहे. यावेळी रस्त्याची पूर्णत: रचनेत बदल झाला आहे. पूर्वी जेथे चढ तेथे उतार, व ज्याठिकाणी उतार तेथे चढ झाला आहे. परिणामी या मार्गावरील जोडरस्त्यावरून येणाऱ्या वाहन चालकांचे अंदाज चुकत आहेत. कोळे येथील कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याची रचना पूर्व उतार तर पश्चिम बाजूस चढ अशी आहे. कोळे गावात जाण्यासाठी तीव्र उतार तर नवीन वसाहतीमध्ये जाण्यासाठी चढण आहे. परिणामी कऱ्हाड-ढेबेवाडी मेनरोडवर येण्यासाठी वसाहतीकडून उतार व कोळे गावाकडून येताना चढ असल्यामुळे दोन्ही बाजूने वाहने वेगात येत असून अंदाज येत नसल्याने हा चौक अपघाती क्षेत्र झाला आहे.
वाढते अपघात टाळण्यासाठी संबंधीत विभागाकडून उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनधारकांमधून होत आहे. मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर गतीरोधक व रस्त्यावरील तीव्र चढ, उतार कमी करण्याची मागणी होत आहे.