पावसाने दडी मारल्याने पिके लागली सुकायला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:24 AM2021-07-05T04:24:22+5:302021-07-05T04:24:22+5:30
कोपर्डे हवेली : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कऱ्हाड उत्तर पूर्व विभागातील पिके सुकू लागली आहेत. ...
कोपर्डे हवेली : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कऱ्हाड उत्तर पूर्व विभागातील पिके सुकू लागली आहेत. यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
खरिपातील पेरण्या पूर्ण होऊन पिकांची दुसरी कोळपणी सुरू झाली आहे. पिके जोमदार आली आहेत. पण सध्या पिकाला पावसाची गरज आहे. पिके सुकू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. येत्या पाच-सहा दिवसांत पाऊस पडला नाही. तर खरीप हंगाम धोक्यात येऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांची पिकांना पाणी देण्याची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी चार दिवसांपासून पाणी देण्यास सुरुवात केली आहे. अनेक शेतकऱ्यांना पाणी देण्याची सोय नसल्याने पावसाअभावी चिंता वाढली आहे.
इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र या विभागात जादा आहे. भूईमूग, घेवडा, उडीद, मका, चवळी आदी पिकांचा समावेश आहे. अंतवडी, रिसवड, शाहापूर, वडोली निळेश्वर, वाघेरी, करवडी, मेरवेवाडी, पाचूंद आदी विभागासाह इतर गावांचा समावेश कऱ्हाड उत्तरमधील पूर्वेकडील विभागात होतो. या विभागाला काही अंशी दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या दोन वर्षांपासून पाण्याची सोय होत असल्याने बागायती शेती शेतकरी करू लागले आहेत. जिरायती क्षेत्र अजून जादा असल्याने येथील शेती पावसावर अवलंबून असते. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
चौकट
ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, त्यांनी पाटपाणी देण्यास सुरुवात केली आहे तर काहींनी तुषार सिंचनाच्या साह्याने पाणी देण्यास सुरुवात केली आहे. जर येत्या चार दिवसांत पाऊस पडला नाही तर खरीप हंगाम वाया जाऊ शकतो, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
फोटो ०४कोपर्डे हवेली
कोपर्डे हवेली परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. पावसाअभावी पिके सुकून चालली आहेत. (छाया : शंकर पोळ)