उन्हाळ्याच्या तोंडावर पिके होरपळली

By admin | Published: February 25, 2015 09:25 PM2015-02-25T21:25:14+5:302015-02-26T00:17:04+5:30

पाण्याअभावी होणार नुकसान : वांग नदीवरील अनेक बंधाऱ्यांत अत्यल्प पाणीसाठा, अनेक ठिकाणी गळती, काही बंधाऱ्यांची कामे अद्याप अपूर्ण

The crops shout in the summer's mouth | उन्हाळ्याच्या तोंडावर पिके होरपळली

उन्हाळ्याच्या तोंडावर पिके होरपळली

Next

कुसूर : वांग नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या काही बधाऱ्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा असला तरी काही बंधाऱ्यात चार दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध असून, ऐन भरात आलेली रब्बी पिके वाया जाण्याची शक्यता आहे. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.वाल्मीक डोंगरावर उगम असलेल्या वांग नदीवर पाटण तालुक्यातील मालदन, साईकडे, मानेगाव आणि काढणे तसेच कऱ्हाड तालुक्यात अंबवडे आणि आणे येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर अखेरीस या बंधाऱ्यात पाणी अडविण्याची प्रक्रिया पूर्ण होते. या उपलब्ध पाण्यावर रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांसह बागायती फळ-भाज्या, ऊस पिके घेतली जातात. या पाण्यावर संपूर्ण विभागातील शेतकरी अवलंबून असून, अनेक गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठीही बंधाऱ्यातील पाण्याचा वापर होत आहे. अंबवडे आणि आणे येथील बंधाऱ्यात गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा असल्याने काही अंशी रब्बी हंगामातील पिकांची चिंता शेतकऱ्यांसमोर नाही. मात्र काढणे बंधाऱ्यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊन आठ दिवस पुरेल एवढाच शिल्लक राहिला आहे. या परिसरात रब्बी हंगामातील पिके परिपक्व होण्यास अजून किमान महिन्याचा कालावधी आहे. परिणामी पिके भरात असतानाच पाणीसाठा कमी झाल्याने हाता-तोेंडाशी आलेली पिके पाण्याअभावी वाया जातात की काय? या भीतीने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)

अडीच हजार क्षेत्र ओलिताखाली
वांग नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात अडविण्यात आलेल्या पाण्यावर सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकेल एवढी साठवण क्षमता आहे.
ऊसक्षेत्रात वाढ
गतवर्षी उसाला चांगला भाव मिळाल्यामुळे पारंपरिक रब्बी पिकांना बगल देऊन अनेक शेतकऱ्यांनी ऊस शतीला प्रथम प्राधान्य दिले. परिसरात उसाचे क्षेत्र लक्षणीय वाढले आहे.
पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न
वांग नदी पात्राशेजारील बहुतांश गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी नदी पात्राशेजारी आहेत. अडविण्यात आलेले पाणी झपाट्याने कमी होत असल्याने ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.


मानेगाव बंधाऱ्यास गळती
वांग नदीवर, मालदन, साईकडे, मानेगाव, काढणे, अंबवडे आणि आणे येथील बंधाऱ्यांत पाणी अडविण्यात आले आहे. मानेगाव येथील बंधाऱ्यांस मोठ्या प्रमाणात गळती असल्याने या बंधाऱ्यात पाणीसाठा होऊ शकला नाही.
खळेत काम अपूर्ण
पाटण तालुक्यातील खळे येथील बंधाऱ्याचे काम अपूर्ण आहे. भोसेगाव आणि मराठवाडी तसेच कऱ्हाड तालुक्यातील येणके येथील बंधाऱ्यांची कामे प्रस्तावित आहेत.

Web Title: The crops shout in the summer's mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.