लोकसेवा केंद्रांचे कोट्यवधी रखडले, शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज भरून दोन महिने झाले
By दीपक देशमुख | Published: October 5, 2023 01:40 PM2023-10-05T13:40:35+5:302023-10-05T14:27:17+5:30
सातारा जिल्ह्यातील २ लाख ७६ हजार १६५ शेतकऱ्यांनी भरला विमा
दीपक देशमुख
सातारा : खरीप हंगामातील पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून केवळ एक रुपया घेण्यात आला. उर्वरित पीक विम्याचे पैसे शासन भरणार होते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा एक रुपया देऊन सीएससी चालकांनी भरून घेतला. यासाठी सामान्य सेवा केंद्रांना प्रत्येक विम्यासाठी ४० रुपये शुल्क देण्याचे ठरले होते. परंतु, दाेन महिने झाले तरी हे पैसे या केंद्रांना अद्याप मिळालेले नाहीत. १२६१ चालकांचे तब्बल १ कोटी १० लाख ४६ हजार ६०० रुपये रखडले असून ही रक्कम लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी होत आहे.
शासनाने बाह्यस्रोताद्वारे अनेक शासकीय कामे करण्यासाठी सेतू कार्यालये, सीएससी सेंटर सुरू केली आहेत. यातून हजारो युवकांना रोजगारही मिळत आहे. परंतु, त्यांची बिले महिना-महिना रखडत असल्याने आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील सीएससी केंद्र चालकांनाही याचा फटका बसला आहे.
महाराष्ट्रात या वर्षीपासून राज्य सरकारने सर्वसमावेशक पीक विमा योजना तीन वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार सीएससी चालकांनी शेतकऱ्यांकडून १ रुपया घेऊन पीक विमा भरून घेतला. मात्र, सीएससी चालकांना पैसे दिले नाहीत. जिल्ह्यात एकूण ४२८७ सीएससी आहेत. यापैकी आजघडीला १२६१ केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांवरून २ लाख ७६ हजार १६५ शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. त्यापोटी १ कोटी १० लाख ४६ हजार ६०० इतकी रक्कम सीएससी चालकांना देय आहे. ३ ऑगस्टला विमा भरण्याचे काम पूर्ण झाले. आत दोन महिने झाले तरी ही बिले अद्याप अदा करण्यात आली नाहीत.
२ लाख ७६ हजार १६५ शेतकऱ्यांनी भरला विमा
जिल्ह्यात २ लाख ७६ हजार १६५ शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केला आहे. यामुळे १ लाख १० हजार ८२९ हेक्टरवरील पिके संरक्षित झाली आहेत. तथापि, १ कोटी १० लाख ४६ हजार ६०० इतकी रक्कम रखडली आहे. त्यामुळे लवकरात लवकर बिल मिळावे, अशी मागणी सीएससी चालकांकडून होत आहे.